वीरला सर्वपित्रीमुळे भाविकांची गर्दी | पुढारी

वीरला सर्वपित्रीमुळे भाविकांची गर्दी

परिंचे; पुढारी वृत्तसेवा: श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे रविवारी (दि. 25) सर्वपित्री अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. पितृ पंधरवड्यातील शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावास्येचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भाविकभक्त श्रीनाथांच्या दर्शनाला आले होते. यामुळे वीरला यात्रेचे स्वरूप आले होते.
रविवारी पहाटे 4.30 वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला.

त्यानंतर सकाळी 6 वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी 10 वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताची पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. दुपारी 12 वाजता देवाची धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. महाप्रसादचे आयोजन विलास धुमाळ, शिवाजी मुगुटराव धुमाळ, आनंदा महाडिक, विलास वांजळे यांनी केले होते.

देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, लाईट, दर्शन बारी, सॅनिटायझर, वाहनतळ, परिसर स्वच्छता आदी सुविधा देण्यात आल्या. दरम्यान, नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. भाविक-भक्तांनी श्रीनाथांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोषबापू धुमाळ यांनी केले आहे. या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष रवींद्र वसंतराव धुमाळ, विश्वस्त बाबूकाका धुमाळ, अमोल धुमाळ, अभिजित धुमाळ, नामदेव जाधव, शिवाजी कदम, संजय कापरे, राजेंद्र कुरपड आदी उपस्थित होते.

Back to top button