Menopause : रजोनिवृत्तीच्‍या भावनांचा सामना करताना… | पुढारी

Menopause : रजोनिवृत्तीच्‍या भावनांचा सामना करताना...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीच्या (Menopause) किंवा रजोनिवृत्तीपूर्व टप्प्यावर असलेल्या महिलांच्या जागतिक आकडेवारीमध्ये दरवर्षी ४७ दशलक्ष महिलांची नव्याने भर पडत आहे. अशीच भर पडत जर गेली तर  २०३० पर्यंत ही संख्या १२० कोटींनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशी गंभीर परिस्थिती असतानाही  या विषयावर अजूनही खुलेपणाने बोलले जात नाही. रजोनिवृत्ती विषयाशी जोडलेल्या भीती किंवा संकोच येत असल्याने रजोनिवृत्तीच्या काळात जाणवणारी त्रासदायक पण त्यावर इलाज करता येण्याजोगी जी काही लक्षणे आहेत ती अनेक महिला मूकपणे सहन करत आसताना पाहायला मिळतात.

पाश्चात्य देशांमध्ये रजोनिवृत्तीचे सरासरी वय पाहिले तर ते ५१ वर्षे आहे, तर भारतामध्ये ते ४६ वर्षे पाहायला मिळते. या बदलाचा स्त्रीच्या आरोग्यावर, स्वास्थ्य आणि एकूणच तिच्या  जगण्याच्या अनेक  बाजूंवर लक्षणीय परिणाम होत असतो.  रजोनिवृत्तीमुळे आपण सामाजिक जीवनात मागे पडत आहोत, असे ३३ टक्‍के महिलांना वाटते. रजोनिवृत्तीच्या काळात सर्वसाधारणपणे जाणवणार्‍या काही लक्षणांबरोबरच (हॉट फ्लशेस आणि रात्री घामाघूम होणे) चिंता,  नैराश्य, झोप न येणे, उदासिनता आणि थकवा अशा मानसिक व्याधी जडण्याचा धोका अधिक संभावतो. मन:स्थिती बिघडल्याने ही परिस्थिती अधिकच आव्हानात्मक बनते व त्यातून चिडचिडेपणा, मनाची एकाग्रता कमी होणे व आत्मविश्वास डळमळीत होणे यांसारख्या भावना अधिक तीव्र होतात, ज्यामुळे एकूणच जगण्याशी जुळवून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो .

रजोनिवृत्तीचा काळ हा अशाप्रकारे मन:स्वास्थ्य बिघडवणारा ठरू शकतो. अंत:स्त्रावांच्या पातळीत चढउतार होत असल्याने मनात विविध भावनांचे कल्लोळ सुरू असतो. मात्र, या टप्प्यावरही एक निरोगी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याचे मार्ग आहेत. तर मग, रजोनिवृत्तीच्या काळामध्ये मनामध्ये उठणार्‍या या भावनिक कल्लोळातून मार्ग काढण्यासाठी पुढीलप्रमाणे मार्ग स्वीकारले तर नक्की रजोनिवृत्तीच्या काळात येणाऱ्या ताणतणावाला सामोरे जाल.

1. मौन सोडा आणि मनमोकळेपणाने बोला

रजोनिवृत्तीच्या काळामध्ये होणारा त्रास हा एकट्याने सहन करण्याची गरज नाही. तुम्हाला होणाऱ्या त्रासाविषयी आपल्या कुटुंबियांशी किंवा मित्रमंडळींशी मनमोकळेपणाने बोलायला सुरुवात करा. तुम्हाला हवी असलेली मदत ताबडतोब मिळण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराजवळ मन मोकळे करणे असो किंवा मित्र- मैत्रिणींशी गप्पा मारणे असो, या गोष्टींमुळे तुम्हाला फार एकटे पडल्यासारखे आणि उदासिन वाटणार नाही आणि तुमचा मूड चांगला होईल. तुम्ही सकारात्मक राहाल

खरेतर, तुमचे निकटवर्तीय अनेक प्रकारे तुमचे महत्त्वाचे आधारस्तंभ असतात. सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तुम्हाला पाठबळ देऊ शकतात, तुमच्या लक्षणांचा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर कशाप्रकारे परिणाम करतात हेसुद्धा समजून घेऊ शकतात. संवादामध्ये पडलेली दरी सांधून आणि अगदी तुमच्या दैनंदिन कामांमध्ये अधिक प्रमाणात हातभार लावूनही ते तुमची मदत करू शकतात. घरगुती कामांची जबाबदारी अधिक प्रमाणात घेणे किंवा जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांना पाठबळ देणे अशा रूपात ही मदत करता येऊ शकते. जसे की तुमच्या दैनंदिन व्यायामात ते तुमची सोबत करू शकतात.

घरात या विषयावर मोकळेपणाने बोलल्याने आपल्याला जाणवणार्‍या अस्वस्थतेविषयी डॉक्टरांशी बोलण्याचा आत्मविश्वासही तुम्हाला मिळू शकेल. शिवाय रजोनिवृत्तीशी संबंधित लक्षणांवर अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, तेव्हा याविषयी डॉक्टरांशी चर्चा  करणे नेहमीच फायद्याचे ठरेल.

2. आपले मानसिक स्वास्थ्य जपा

रजोनिवृत्तीच्‍या तुमच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मूड बदलत राहणे, उत्साह नसणे, ताणतणाव आणि मानसिक आरोग्याशी बऱ्याच समस्या उद्भवू शकतात.“रजोनिवृत्तीच्या आधी, अंत:स्त्रावांच्या पातळीत होणार्‍या बदलांची सुरुवात ही प्रक्रिया सर्वसाधारणपणे वयाच्या चाळिशीत होते आणि ती चार वर्षांपर्यंत किंवा कधी-कधी दहा वर्षेही चालू राहू शकते. याच काळात मानसिक स्वास्थ्यावरही लक्षणीय परिणाम होऊ शकतो. या काळात, नैराश्याच्या घटनांचे प्रमाण दुपटीने वाढते आणि महिलांना अचानक भीती वाटणे  (पॅनिक अटॅक्स) या गोष्टींचा दैनंदिन आयुष्यावर तीव्र परिणाम होत असेल तर ही परिस्थिती हाताळण्यासाठी व्यावसायिक मदत घेण्याचा सल्ला दिला जातो.

”इंडियन मेनोपॉज सोसायटीच्या माजी अध्यक्ष, तन्वीर हॉस्पिटल, हैदराबाद येथील सल्लागार आणि इंडियन मेनोपॉज सोसायटी रजिस्ट्रीच्या अध्यक्ष डॉ. मीता सिंग सांगतात, मानसिक स्वास्थ्याशी संबंधित उपचाराच्या सर्वसाधारण पद्धतींमध्ये समुपदेशन आणि संज्ञानात्मक वर्तणूक उपचारपद्धती यांचा समावेश होतो. या प्रकारच्या उपचारांमुळे रजोनिवृत्तीशी संबंधित चिंतांचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. यामुळे तुमचे विचार, भावना आणि वागण्यासंबंधीच्या प्रश्नांवर उपाय सापडू शकतो व त्यामुळे तुमच्या शारीरिक लक्षणांची तीव्रता कमी होण्यासही मदत होऊ शकते. मानसिक ताणतणावांची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही सजग राहणे व ध्यानधारणेसारख्या मनावरील ताण सैल करणार्‍या पद्धती अवलंबू शकता.

3. कामाच्या ठिकाणी व्यक्त व्हा

 

रजोनिवृत्तीच्या काळात ४५ टक्‍के महिलांना कमी झालेल्या कार्यक्षमतेमुळे कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करणे कष्टाचे जाते. तुम्हाला एकटे पडल्यासारखे वाटत असेल किंवा कामात उत्साह येत नसेल तर आपल्या सहकार्‍यांशी किंवा समवयस्क व्यक्तींशी बोलत राहा. तुमची लक्षणे तुमच्या दैनंदिन कामामध्ये कशाप्रकारे अडथळा आणत आहेत याविषयी चर्चा करा आणि त्यावर उपाय शोधा.  वेगवेगळी कामे करा. उदाहरणार्थ, शक्य तेव्हा कामातून विश्रांती घेणे किंवा हॉट फ्लशेसचा त्रास होऊ नये यासाठी डेस्कवर पंखा ठेवणे, असे उपाय करून पहायला हवेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मदतशीर ठरेल अशी यंत्रणा तयार केल्याने तुम्ही आपल्या लक्षणांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल.

4. समाजामध्ये मदत शोधा 

मित्रमंडळी असोत, कुटुंबिय असोत किंवा तुमच्या सामाजिक वर्तुळातील इतर महिला असोत. त्यांच्याशी चर्चा करा. “रजोनिवृत्तीमुळे होणार्‍या बदलांचा काळ स्त्रियांसाठी प्रचंड आव्हानात्मक ठरू शकतो. अबॉटमध्ये आरोग्य उपाययोजनांच्या माध्यमातून आणि सर्वांगीण देखभालीसाठीचे रुग्ण-केंद्री उपक्रम अग्रक्रमाने राबवित आयुष्यांमध्ये अधिक चांगले बदल घडवून आणण्याप्रती कटिबद्ध आहेत. स्वतंत्रपणे चालविण्यात येणारी मेनोपॉज सेंटर्स ऑफ केअर, रुग्ण-जागरुकता कार्यक्रम आणि डॉक्टर-पेशंटमध्ये संवाद घडवून आणणारे मंच यांच्या माध्यमातून अर्थपूर्ण संवादास चालना देण्याचा प्रयत्न केला जातो. जेणेकरून महिलांना त्यांच्या आयुष्यातील या टप्प्याला स्वीकारण्यासाठी सक्षम बनता यावे.

मेडिकल अफेअर्स विभागाचे संचालक डॉ. जीजो करणकुमार सांगतात, आपल्या कुटुंबियांशी आणि डॉक्टरांशी बोलणे, समाजामध्ये आणि कामाच्या ठिकाणी आधार यंत्रणा तयार करणे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठीचे मार्ग शोधणे अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे स्त्रियांना रजोनिवृत्तीसारख्या नैसर्गिक प्रक्रियेदरम्यान मन:स्थितीत होणार्‍या तीव्र चढउतारांशी आणि शारीरिक बदलांशी जुळवून घेण्यास मदत होऊ शकते. आयुष्याच्या एका नव्या पर्वामध्ये प्रवेश करताना ही पावले उचलल्याने तुम्ही बदलांच्या या लाटेवर सहज स्वार होऊ शकता.

Back to top button