"कुछ दाग अच्छे होते है" | पुढारी

"कुछ दाग अच्छे होते है"

नाशिक : चंद्रमणी पटाईत

मासिक पाळीसंदर्भात आजही समाजात फारसं बोललं जात नाही. अनेक ठिकाणी मासिक पाळी हा ‘विटाळ’ मानला जातो. काही घरांमध्ये मासिक पाळी आलेल्या महिलांना दूर ठेवलं जातं. काळजाचा तुकडा असणार्‍या लेकीला मासिक धर्म प्राप्त झाल्याचं औचित्य साधत एका क्रांतिकारी पित्याने या उत्सवाच्या पत्रिका छापत अस्पृश्य मानल्या गेलेल्या, या विषयावर समाजजागृतीसाठी चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यान आणि स्नेहभोजन अशा कार्यक्रमाचे आयोजन करून सहसा बोलल्या न जाणार्‍या विषयाला वाचा फोडली आहे.

गत आठवड्यात नाशिकमधील एका सामाजिक कार्यकर्त्याने लाडक्या लेकीच्या प्रथम पाळीनिमित्त महोत्सव साजरा केला. ज्या विषयावर कोणी सहसा उघडपणे बोलत नाही, अशा विषयाला हात घालत, त्याला सामाजिक स्तरावर नेऊन राज्यभर चर्चा होईल, असा उपक्रम राबवून परिवर्तनाच्या चळवळीत एक हात टाळीसाठी पुढे केला आहे. आता दुसर्‍या हाताने टाळी वाजवण्याची पाळी आपली आली आहे, असा संदेश या निमित्ताने सर्वांना मिळाला आहे. साधारण वयाच्या 13 ते 15 व्या वर्षादरम्यान मुलीला पाळी येण्यास प्रारंभ होतो, असे वैज्ञानिक क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. मासिक पाळी येणं, ही गोष्ट केवळ ती मुलगी आणि तिची आई किंवा घरातील महिलांपुरतीच मर्यादित राहात असते, तर कुटुंबातील पुरुषांना मात्र याबाबत पुसटशीही कल्पना देण्यात येत नसते. परंतु जसजसा काळ बदलत आहे, तसतसे जीवनशैलीतही बदल होत आहेत. शारीरिक, मानसिक व्याधींसह कौटुंबिक आणि निर्णायक गोष्टींवर सर्व जण एकमताने सल्ला-मसलत करून निर्णय घेत असतात. आताच्या मुलीही तशा फॉरवर्ड झाल्या असल्याने, सर्वच विषयांवर त्या बिनधास्त बोलू लागल्या आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी लेकीच्या पहिल्या पाळीचा उत्सव साजरा करण्याचा निणर्र्य घेतला, तो अभिनंदनीयच!

टीव्हीवर कपडे धुण्याच्या पावडरची जाहिरात नेहमी प्रक्षेपित होत असते. त्यात ‘कुछ दाग अच्छे होते हैं’ असं वाक्य आहे. हे वाक्य पाळीत पडणार्‍या डागांसाठीही का लागू होऊ नये? ज्या मासिक धर्मामुळे रजोवृत्तीस चालना मिळून नवे बीजारोपण होण्यास मदत होते, अनेकांना अपत्यप्राप्तीसाठी मदत होते, त्या डागांना आपणही का ‘अच्छे’ म्हणू नये? हे डाग चांगले आहेत, अशी आपली भावना निर्माण होणे गरजेचं आहे. मासिक पाळी ज्या महिला, मुलीला आली आहे, त्यांची काळजी घेणं हे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. मासिक पाळी शब्द जरी काढला, तरी त्याकडे संकोचाने पाहिलं जातं. याबाबत अनेक अंधश्रद्धा, गैरसमज आहेत. पण या सर्वांना छेद देण्याचं काम या नव्या प्रयोगाने केलं आहे. पहिल्या पाळीचा उत्सव साजरा करण्याचा विचार येणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं हेसुद्धा मोठ्या दिलाचं काम आहे. केवळ स्वत:चा बडेजाव न करता, यातून सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. मासिक पाळीवर जनजागृती करणारे व्याख्यान, ‘कोश’ हा पाळीवर आधारित लघुपट दाखवणं, पाळीची संदेश देणारी गाणी, संत साहित्यात सापडलेल्या अभंगांचे सादरीकरण, गरजू मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप, ‘प-पाळीचा’ ही माहितीपुस्तिका वितरित करणं आणि चर्चासत्र आदी प्रबोधनात्मक उपक्रम चांदगुडे परिवाराने घेतले. त्यांनी प्रबोधनास कृतीची दिलेली ही जोड सर्वसामान्यांनाही पुढाकार घेण्यासाठी तयार केलेला मार्ग म्हणता येईल. त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या विषयाकडे समाजाने सकारात्मकतेने पाहावं, आपल्या कुटुंबातील महिला, मुलींना पाळीच्या कालावधीत आराम करू देणं, त्यांना हवं-नको ते देणं, ही आपली नैतिक जबाबदारी समजावी. दुकानातून पुरुष मंडळींनी सॅनिटरी पॅड आणण्यास मनात कोणताही कुविचार आणू नये. खुल्या आणि स्वच्छ मनाने नॅपकिन आणून ‘पॅडमॅन’ची भूमिका साकारत कुटुंबातील मासिक धर्म आलेल्या महिलेच्या या उत्सवात सहभागी व्हावं, एवढंच.

हेही वाचा:

Back to top button