उन्हाळ्यात स्त्रियांच्या मासिक पाळीत होतो बदल, काय काळजी घ्यावी? | पुढारी

उन्हाळ्यात स्त्रियांच्या मासिक पाळीत होतो बदल, काय काळजी घ्यावी?

तापमानाचा वाढता पारा, सततच्या घामामुळे होणारे डिहायड्रेशन आणि याचा परिणाम मासिक पाळीवर होतो. स्त्रीच्या मनःस्थितीप्रमाणेच बदलते हवामानदेखील तीच्या मासिक पाळीवर परिणाम करू शकते. हवामान उष्ण आणि दमट असताना बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीत बदल जाणवतात.

ऋतूबदलाचा स्त्रीच्या मासिक पाळीशी संबंध असतो. उन्हाळ्यात मासिक पाळी दीर्घ काळ राहू शकते. पौगंडावस्थेतील मुली आणि पेरी-मेनोपॉज अवस्थेतील महिलांना

हार्मोन्स अस्थिर असल्यामुळे जास्त त्रास होतो. संशोधनानुसार, जास्त सूर्यप्रकाशामुळे मासिक पाळीच्या कालावधीत बदल होऊ शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही नवीन ठिकाणी जाल जेथे हवामान गरम किंवा थंड असेल, तर तुमच्या शरीराला तापमानाशी जुळवून घेण्यात अडचण येईल. त्यामुळे मासिक पाळीच्या कालावधीत फरक पडू शकतो. विविध अभ्यासांनुसार असे स्पष्ट झाले आहे की, व्हिटॅमिन डी शरीराला फॉलिकल-उत्तेजक संप्रेरक तयार करण्यास मदत करते, जे पुनरुत्पादक कार्ये नियंत्रित करते. उष्ण वातावरणात राहणार्‍या महिला शरीर झाकणारे कपडे घालतात. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन डीच्या कमी पातळीचा डिम्बग्रंथी रिझर्व्हशी संबंध आहे.

* उपलब्ध पुराव्यांनुसार, तापमान मासिक पाळीवर परिणाम करू शकत नाही; परंतु यामुळे थकवा, तणाव, पुरळ आणि अगदी अस्वस्थता यासारखी विविध चिंताजनक लक्षणे उद्भवू शकतात जी मासिक पाळीच्या वेळी दिसतात.

* बहुसंख्य महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान यीस्ट संसर्गाचा त्रास होतो. कारण, गरम आणि दमट वातावरणात जीवाणूंची झपाट्याने वाढ होते. शिवाय, उन्हाळ्यात योनीमार्गात होणारे संक्रमण हेदेखील अनियमित मासिक पाळीच्या कारणांपैकी एक असू शकते. जास्त घाम येणे, उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाईट असंतुलन, त्वचेला खाज सुटणे आणि यीस्ट इन्फेक्शन हे होऊ शकते.

* उन्हाळ्यात तुमच्या खाण्याच्या सवयींचाही मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. जसे आंबा, पपई किंवा अननस यासारखे उष्ण पदार्थ खाल्ल्याने तुमची मासिक पाळी लवकर येते. कारण, त्यामुळे ओटीपोटात उष्णता निर्माण होते आणि गर्भाशय आकुंचन पावते. तणावदेखील मासिक पाळीवर परिणाम करू शकतो.

* उन्हाळ्यात नियमित व्यायाम केल्याने तुमची सायकल एक किंवा दोन दिवसांनी लांबू शकते.

* मासिक पाळीदरम्यान हार्मोनल चढ-उतारांमुळे तुमच्या शरीरात नेहमीपेक्षा जास्त पाणी आणि मीठ टिकून राहते. मासिक पाळीत तुमचे पोट फुगलेले दिसेल. अति उष्णतेमुळे निर्जलीकरण आणि मासिक पाळीच्या दरम्यान अस्वस्थतादेखील होते.

* दिवसभरात पुरेसे पाणी प्या. जे तुम्हाला निर्जलीकरण आणि डोकेदुखीचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते. खारट पदार्थांचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करा. फळे आणि सॅलडस्ची निवड करा. जंक फूड, मसालेदार, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थांचे सेवन कमी करा, तणावमुक्त आणि निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करा, चांगली वैयक्तिक स्वच्छता ठेवा, सैल सुती कपडे/अंतर्वस्त्र घाला. वारंवार आंघोळ करा आणि यीस्ट संसर्ग टाळण्यासाठी तुमचे सॅनिटरी पॅड बदलावे.

डॉ. मीता नाखरे

Back to top button