मासिक पाळी : निसर्गाप्रमाणे स्त्रीच्या मासिक चक्रातही अनियमितता

Postpone periods
Postpone periods
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा
स्त्रीची मासिक पाळी नियमित असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते. अलीकडे बदलत्या भौगोलिक आणि सामाजिक पर्यावरणाचा परिणाम स्त्रीच्या आरोग्यावर ठळकपणे जाणवू लागला आहे. निसर्गचक्र बदलत आहे तसेच स्त्रीचे मासिकचक्रही अनियमित होताना दिसते. स्त्रीशरीर सृजनशील असल्याने निसर्गाने तिच्यावर पुरुषांपेक्षा अधिक जबाबदारी दिली आहे. यादृष्टीने स्त्री आरोग्य हा अधिकच काळजीचा विषय म्हणून पाहिले पाहिजे, असे आवाहन आहारतज्ज्ञ सुनीता वैराट यांनी केले.

महिलांना आरोग्यविषयक माहिती देताना सुनीता वैराट म्हणाल्या, मासिक पाळी ही स्त्रियांच्या शरीरातील हार्मोनल प्रक्रिया आहे. साधारण 28 दिवसांनी पाळी येणे शारीरिकदृष्ट्या आरोग्यपूर्ण मानले जाते. काहीवेळा 21 ते 31 दिवसांचा कालावधीही ठीक मानला जातो. पण, वर्तमान काळात हे निसर्गचक्र बिघडले आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. बदलता काळ, स्त्रीची वाढत जाणारी जबाबदारी, उघड किंवा छुपे ताण, आहाराकडे झालेले दुर्लक्ष, वजनवाढ, लठ्ठपणा, स्त्रीची होणारी अक्षम्य आबाळ या सर्वांचा परिणाम स्त्रीच्या शरीर-मनावर झालेला दिसतो. एकूणच स्त्रीचे मासिक पाळीचे चक्र अनियमित होणे हे स्त्रीच्या आरोग्यासाठी घातक आहे.

मासिक पाळीत, ठराविक काळाने आणि योग्य प्रमाणात रक्तस्त्राव होणे हे आरोग्याच्या दृष्टीने नैसर्गिक आहे. ते तसे होत नसेल तर त्याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधले पाहिजेत. पाळीपूर्व काळात किंवा चालू असताना ओटी पोटात दुखते, पाय दुखतात, पाठ किंवा कंबर दुखते, काहीवेळा डोके दुखते, थकवा येऊन झोपून राहवेसे वाटते. हा त्रास सामान्य ते अति वेदनेचा असू शकतो. गर्भाशयाशी संबंधित पण सर्व शरीर-मनावर परिणाम करणारी पाळी म्हणूनच चिंतेचा विषय बनली आहे. फक्त एखादा-दुसरा दिवसच किंवा पंधरा, वीस-वीस दिवस रक्तस्राव होण्याचे प्रमाणही वाढले आहे.अत्यल्प किंवा अत्यंत रक्तस्त्राव हाही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर विषय मानला पाहिजे. चेहर्‍यावर मुरुमे येणं, त्वचा तेलकट होणं, चिडचिडेपणा, स्थूलता, अंगावर तांबडे-पांढरे जाणे, पी.सी.ओ.डी., पी.सी.ओ.एस.चा त्रास ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. अशा त्रासातून सुटका व्हावी म्हणून अनेकदा गर्भाशय काढून टाकण्याची वेळ येत असल्याचे सुनीता वैराट यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, स्त्रीच्या मासिक पाळीचा आणि आहाराचा निकटचा संबंध आहे. नियमित पाळीसाठी बॅलन्स्ड डाएट महत्त्वाचा ठरतो. फायबर, प्रोटिन, लोह, कॅल्शिअम आणि 'ब' जीवनसत्त्वयुक्त आहार नियमितपणे घ्यायला हवा.पालक, माठ, राजगिरा, चाकवत या भाज्या, जवस, मगज बी, हळद घालून दूध, मासे अशा पदार्थांचा समावेश आहारात केला पाहिजे. पातळ पदार्थांमध्ये, भाज्यांचे सूप, नाचणीची पेज, कोकम सरबत, शहाळ्याचे पाणी तर फळांमध्ये संत्री, मोसंबी, पपई आदी फळे खावीत. पाळी सुरू असताना पचायला हलका आणि ताजा आहार घ्यावा. तेलकट, आंबट, तळलेले, मसाल्याचे चमचमीत पदार्थ टाळावेत. टोमॅटो, गाजर, बीट आदी पदार्थांची कोशिंबीर भरपूर खावी. अशा सात्त्विक, पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेला समतोल आहार घेतला तर मासिक पाळीच्या तक्रारी बर्‍याच अंशी कमी होतील, असा सल्लाही त्यांनी दिला.

लठ्ठपणा आणि मासिक पाळी…

लठ्ठपणाचा अनियमित पाळीशी, काहीवेळा वंध्यत्वाशी संबंध जोडला जातो. प्रमाणापेक्षा अधिक वजन असेल तर काहीवेळा गर्भधारणा होत नाही म्हणून वजन कमी करण्याचा सल्ला वंध्यत्व निवारणतज्ज्ञ देतात. अतिरिक्त वजन असेल तर हार्मोनल परिवर्तन होऊन 30 ते 45 टक्के स्त्रियांची पाळी अनियमित होते. अशा स्त्रियांनी एकूण वजनाच्या 10 टक्के वजन कमी केले तर मासिक पाळी नियमित होण्याची शक्यता कैक पटीने वाढते. कोणत्याही वयात थोड्याफार प्रयत्नाने वजन कमी करता येणे शक्य आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायामाच्या सवयीने वजन कमी करता येते किंवा आटोक्यात तरी ठेवता येते, असेही सुनीता वैराट यांनी सांगितले.

आहारतज्ज्ञ सुनीता वैराट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news