आता तृतीयपंथीयांनाही वैमानिक होण्याची संधी | पुढारी

आता तृतीयपंथीयांनाही वैमानिक होण्याची संधी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : समाजाकडून बहुतांश वेळा अवहेलना आणि हीन दर्जाची वागणूक मिळणार्‍या तृतीयपंथीय व्यक्‍तींना आता वैमानिक बनण्याचे दरवाजे खुले झाले आहेत. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) याबबातचे दिशानिर्देश जारी केले असून देशातील सुमारे 5 लाख तृतीयपंथीयांपैकी इच्छुकांना अटी पूर्ण केल्यावर वैमानिक म्हणून कायदेशीर मान्यता मिळेल.

अमेरिका, इंग्लंड आदी देशांत काही वर्षांपूर्वीच तृतीयपंथीय वैमानिकांना विमान उडविण्यास रीतसर परवानगी देण्यात आली होती. भारतात काही कायदेशीर बाबींमुळे ती प्रक्रिया रखडली होती. डीजीसीएच्या ताज्या दिशानिर्देशांनुसार वैमानिक पदाची परीक्षा देणार्‍या तृतीयपंथीयांना त्यांची शारीरिक व मानसिक क्षमता आणि चाचणीतील कौशल्याच्या आधारावर वैमानिकपदाचा परवाना मिळू शकतो. लिंगपरिवर्तन किंवा हार्मोन बदलाचे उपचार घेऊन ज्यांना 5 वर्षे झाली आहेत असे किंवा अन्य तृतीयपंथी उमेदवार वैमानिकपदासाठी अर्ज करू शकतात.

लिंगपरिवर्तनानंतर होणार्‍या मानसिक परिस्थितीचीही चाचणी घेण्यात येईल. त्यांना डॉक्टरांचे वैध प्रमाणपत्र सादर करावे लागेल. याशिवाय डीजीसीएच्या डॉक्टरांचेही फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असेल. जे तृतीयपंथी वैमानिक नोकरी लागल्यावर लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया किंवा हार्मोन उपचार घेतील त्यांना किमान तीन महिने कामावर रूजू करून घेता येणार नाही. या काळात त्यांना अनफिट घोषित कले जाईल. त्यानंतर सर्व चाचण्यांमध्ये उतीर्ण झाल्यावरच त्यांना संबंधित विमान कंपन्या पुन्हा वैमानिक म्हणून रूजू करून घेता येऊ शकतात, असे सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button