अमित ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद; मनसे विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी पुण्याचा दौरा | पुढारी

अमित ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद; मनसे विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी पुण्याचा दौरा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मनसे विद्यार्थी सेनेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांंशीही संवाद साधत शहरातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी करण्यासाठी ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौर्‍यावर आले आहेत. दौर्‍याच्या पहिल्या दिवशी ठाकरे यांनी तीन ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुंबईहून सकाळी पुण्यात आगमन झाल्यानंतर राजमहालापासून कोथरूडमधील संगम चौकापर्यंत रॅली काढण्यात आली.

या वेळी ठाकरे यांनी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी कोथरूड येथील एका शाखेचे उद्घाटन केले. त्यानंतर राजूशेठ शिंदे सभागृहात कोथरूड, खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर दुपारी गोखलेनगर येथे शिवाजीनगर व वडगाव शेरी मतदारसंघातील विद्यार्थ्यांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

सायंकाळी एच. व्ही. देसाई कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. शहरातील प्रभाग पद्धती, होणारे परिणाम याची माहिती जाणून घेतली. या वेळी मनसे नेते राजेंद्र वागसकर, अजय शिंदे, किशोर शिंदे, बाळा शेडगे, गणेश सातपुते, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, वसंत मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button