ठाणे : मुख्यमंत्र्यांनी निभावली पालकत्वाची जबाबदारी; बिहारमधील जखमींसाठी पाठवले विशेष विमान | पुढारी

ठाणे : मुख्यमंत्र्यांनी निभावली पालकत्वाची जबाबदारी; बिहारमधील जखमींसाठी पाठवले विशेष विमान

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : बिहारची राजधानी पाटणा येथे सातारा जिल्ह्यातील मौजे गुरसाळे (ता. खटाव) येथील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री दाेन वाजता त्यांच्या राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट झाला. यात कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ पाटणा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारासाठी पुणे किंवा मुंबई येथील भाजलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या विशेष रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला. आणि एअर अम्ब्युलन्स मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

यावेळी एअर अम्ब्युलन्स कंपनीने एका वेळी एकच रुग्ण नेता येईल, असे सांगितले. त्यामुळे सदर कुटुंबाचे नातेवाईक हतबल झाले. हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार, हा गंभीर प्रश्न समोर ठेवून शनिवारी ते कुटुंबीय दिवसभर अश्रू ढाळत होते. यावेळी नातेवाईकांनी त्यांच्या भागातील अनेकांकडे मदतीचा हात मागितला. पण यश येऊ शकले नाही. हवाई वाहतुकीचा अमाप खर्च असल्याने नातेवाईकांचा मानसिक ताण वाढत चालला होता. दरम्यान, एका नातेवाईकाने सांगलीतील आमदार अनिल बाबर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला.

संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तत्काळ सूत्रे फिरली. ठाण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितत्काळ, शासकीय एअर अम्ब्युलन्स मिळण्यासाठी विनंती केली. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय एअर अम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही.

वेळ अतिशय नाजूक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून २, एअर अम्ब्युलन्स बुक केल्या. त्या कुटुंबाला तातडीने पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना दिले. त्यानंतर जखमीपैकी ११ वर्षाच्या मुलास घेऊन आज (दि.१७) सकाळी ६ वाजता स्पेशल विमान पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जखमीपैकी दुसऱ्या १२ वर्षाच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान सकाळी ११ वाजता विमानतळावर दाखल झाले. दोन्ही जखमी रुग्णांना, शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले.

वेळेवर मदत मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना विमानतळावर अश्रू अनावर झाले होते. आमच्याकडे शब्द नाहीत, माणसांत देव असतो, हे आज आम्हाला समजल्याची भावना व्यक्त करत होते. नाव, गाव, पत्ता, ना ओळख, ना कोणाची शिफारस, काहीही माहिती नसताना साहेबांनी आम्हाला मदत केली. मदतीसाठी आम्ही खूप लोकांना बोललो, पण मदत होऊ शकली नाही. परंतु शिंदेसाहेब आमच्या मदतीला धावून आले. आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्या रूपाने साक्षात विठ्ठल पाहिल्याची भावना रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत होते. तसेच मुलं बरी झाल्यानंतर त्यांना घेऊन शिंदे साहेबांना भेटण्यास घेऊन जाणार असल्याचे रुग्णाच्या आईने सांगितले.

आमच्या मूळ गावी हे समजल्याने सर्व गावकऱ्यांनी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केले. बिहार येथेही शिंदे साहेबांबद्दल तेथील स्थानिक व मराठी लोकांनी ‘शिंदे साब को मान गये’ अशी भावना व्यक्त केल्याचे सांगितले. ही सर्व हकीकत सांगताना रुग्णांच्या नातेवाईकांच्या अंगावर काटे व डोळ्यात पाणी येत होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button