राहुरीत 22 गावांना 1.10 कोटी मंजूर, माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांची माहिती | पुढारी

राहुरीत 22 गावांना 1.10 कोटी मंजूर, माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांची माहिती

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी मतदारसंघातील 22 गावांना क्रीडा विभागांतर्गत व्यायाम शाळा साहित्यासाठी सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाले आहेत. संबंधित गावांत या विभागामार्फत साहित्य पोहोच करण्याचे काम सुरु झाल्याची माहिती माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

आ. तनपुरे म्हणाले की, राहुरी मतदारसंघात व्यायामशाळा साहित्यांकरिता ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार पाथर्डी तालुक्यात 17 गावे यामध्ये मांडवे, करंजी, खांडगाव, घाटशिरस, जवखेडे, मोहोज खु., सातवड, मोहोज बु, डमाळवाडी, कामत शिंगवे, शिंगवे केशव, निंबोडी, वैजुबाभुळगाव, शिराळ, कौडगाव, सोमठाणे खु, तिसगाव, तर राहुरी तालुक्यातील 5 गावांना वांबोरी, बाभुळगाव, राहुरी खु., सोनगाव, कणगर या गावांना व्यायामशाळा साहित्यांचा लाभ मिळणार आहे.

या गावांमधील युवक व तरुणांनी अनेक दिवसांपासून व्यायामशाळा साहित्यांची मागणी आ. तनपुरे यांच्याकडे केली होती. या मागणीची योग्य दखल घेऊन आ. तनपुरे यांनी शासनाच्या क्रीडा विभागातून 1 कोटी 10 लाख रुपयांचे व्यायामशाळा साहित्य मंजूर केले आहे.
प्रत्येक गावामध्ये प्रत्येकी 5 लाखाप्रमाणे अतिशय उच्च दर्जाचे हे व्यायाम शाळा साहित्य आहे. युवक व तरुणांनी शरीर सदृढ राहण्यासाठी या साहित्यांचा वापर करावा, असे आवाहन आ. तनपुरे यांनी केले आहे.

व्यायामशाळांच्या साहित्यामुळे लाभार्थी गावातील तरुण व युवकांनी आ. तनपुरे यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले.
सरकार बदलले असले तरी मतदारसंघातील विकास थांबणार नाही. यापुढील काळातही विकास कामे जोमाने सुरुच राहतील, असा विश्वास आ. तनपुरे यांनी व्यक्त केला.

Back to top button