महाराष्ट्रात राजकीय भूकंप; मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १३ आमदार नॉटरिचेबल | पुढारी

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १३ आमदार नॉटरिचेबल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप घडतो की काय याची चर्चा सुरू झाली आहे. काल रात्री विधान परिषद निवडणूक होताच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नॉटरिचेबल झाल्याचे समजले. त्यांच्यासह शिवसेनेचे १३ आमदारही नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे यांच्याकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार काठावर विजय झाले असले तरी शिवसेनेची आणि शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष, छोट्या पक्षांची मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना प्रत्येकी २६ मते मिळाली असली तरी त्यांना अधिकचा कोटा देण्यात आला होता. मात्र या कोट्याप्रमाणे दोघांनाही मत पडलेली नाहीत. गुप्त मतदानात शिवसेना आमदारनीही भाजपच्या पारड्यात मत टाकल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मतदानानंतर लगेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना वर्षा निवासस्थानी बोलवले होते. मुंबईतील आमदार तर ‘वर्षा’वर कालच दाखल झाले. मात्र या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे १३ आमदार नॉटरिचेबल झाले आहेत. ते गुजरातला गेल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसापासून शिवसेनेत एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी ‘वर्षा’वर शिवसेना आमदार आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार उपस्थित राहतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला ते हजर राहिले नाही तर राज्यात राजकीय भूकंप अटळ मानला जात आहे.

 हे ही वाचा :

Back to top button