MLC Election 2022 : देवेंद्र फडणवीसांचा डंका; महाविकास आघाडीला पुन्हा धक्‍का | पुढारी

MLC Election 2022 : देवेंद्र फडणवीसांचा डंका; महाविकास आघाडीला पुन्हा धक्‍का

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषदेच्या (MLC Election 2022) दहा जागांच्या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली. अपुरे संख्याबळ असतानाही फडणवीस यांनी आपला करिष्मा दाखवून अटीतटीच्या सामन्यात भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आणला आणि राज्यसभेपाठोपाठ आपल्या नव्या टेक्निकचा चमत्कार दाखवला. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाल्याने महाविकास आघाडीला धक्‍का बसला. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे, काँग्रेसचे भाई जगताप हे विजयी झाले.

दहा जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 2022) रिंगणात होते. महाविकास आघाडीने सहा तर भाजपने पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विधान परिषदेचे विद्यमान सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे पहिल्या फेरीतच निवडून आले. त्याचबरोबर भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, उमा खापरे, राम शिंदे व श्रीकांत भारतीय हे पहिल्या फेरीत निवडून आले. शिवसेनेचे सचिन अहिर व आमश्या पाडवी पहिल्या फेरीत निवडून आले.

उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे ः- भाजपचे प्रविण दरेकर (29) राम शिंदे (30), श्रीकांत भारतीय (30), उमा खापरे (27), प्रसाद लाड (28) शिवसेनेचे सचिन अहीर (26), आमश्या पाडवी (26), राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर (28), एकनाथ खडसे (28). काँग्रेसचे भाई जगताप (26) सर्व विजयी. पराभूत काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे (22).

महाविकास आघाडीची २१ मते फुटली (MLC Election 2022)

या निवडणुकीत दोन मते बाद झाली. एक मत राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर तर भाजपच्या उमा खापरे यांचे होते. तिसर्‍या क्रमांकाचे मत गिरवल्याने ही दोन मते बाद झाली. दरम्यान काँग्रेसची दोन मते फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर महाविकास आघाडीची 21 मते फुटल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीने राज्यसभेतील पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केले होते. मात्र त्यांचे हे नियोजन सपशेल फसल्याचे निकालावरून सिद्ध झाले आहे. मतांची पुरेशी व्यवस्था नसतानाही भाजपने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद जागा जिंकून महाविकास आघाडीच्या नेत्यांना पराभवाची कडवट चव चाखायला लावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह दिग्गज नेते निवडणुकीची रणनिती आखत होते. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या रणनीतीने यासर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरविले आहे.

विधानपरिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे 285 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदानानंतर काँग्रेसने भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी मदतनीस घेऊन मतदान केल्याने गुप्त मतदान प्रक्रियेचा भंग केल्याचा आक्षेप घेतला. त्यामुळे मतमोजणीला दोन तास विलंब झाला. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने ही तक्रार फेटाळून लावल्यानंतर मतमोजणी सुरू झाली.

विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. या दहा जागांमध्ये महाविकास आघाडीचे सहा तर भाजपचे पाच मिळून एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत विधानसभेच्या 288 पैकी 285 आमदारांनी मतदान केले. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाले असून मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना यावेळीही न्यायलयाने मतदानाची संधी नाकारल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली तेंव्हा भाजप आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पहिले मतदान केले. सर्वच प्रमुख पक्षांनी शेवटी गोंधळ नको म्हणून लवकर मतदान करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मतदान प्रक्रियेवर जातीने लक्ष ठेवून होते. तारांकित हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांना बसेसने विधानभवनात आणून मतदान करवून घेतले जात होते. शेवटच्या मतापर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरु होती.

क्षितिज ठाकूर अमेरिकेतून थेट मतदानाला (MLC Election 2022)

राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची मते निर्णायक होती. त्यामुळे अमेरिकेत गेलेले बाविआ चे आमदार क्षितीज ठाकूर हे सकाळीच मुंबईत दाखल झाले.

राज्यसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला साथ दिल्याने शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला. यावेळीही भाजपने ठाकूर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी देखील ठाकूर यांची भेट घेतली होती. पण ठाकूर यांनी यावेळीही भूमिका स्पष्ट केली नाही.

आमदार क्षितीज ठाकूर हे अमेरिकेत असल्याने ते मतदानाला येणार नाहीत अशी चर्चा होती. त्यामुळे यावेळी बहुजन विकास आघाडीची दोन मते मतपेटीत पडतील, अशी चर्चा होती. मात्र क्षितीज ठाकूर हे मतदानाला आले.

लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांची यावेळीही भाजपला साथ (MLC Election 2022)

विधानपरिषद निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे असल्याने भाजपने यावेळीही आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे मतदान करून घेतले. या दोन्ही आमदारांची प्रकृती दुर्धर आजारामुळे खलावली आहे. मात्र राज्यसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीही या दोन्ही आमदारांनी मतदान करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे त्यांना पुण्याहून रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. त्यांनी मतदानासाठी मदतनिसांची मदत घेतली. त्यामुळे मतदानाची गुप्तता पाळली नाही, असा आक्षेप काँगसकडून घेण्यात आला. मात्र या दोघांनी मतदानासाठी मदतनीस देण्याची लेखी परवानगी मागितली होती आणि तशी नियमात तरतूद असल्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. त्यावर काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यामुळे मतमोजणीला सुमारे दोन तास उशिराने सुरूवात झाली.

फडणवीसांचा करिष्मा आणि दबदबा कायम

राज्यसभेतील पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने काळजीपूर्वक पावले टाकूनही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या चाली परतावून लावत आपला करिष्मा आणि दबदबा राज्याच्या राजकारणात कायम ठेवला आहे.

शिवसेनेच्या तीन मतांसह कोट्यातील अपक्षांची 8 मते फुटली

या निवडणुकीत शिवसेना व त्यांना पाठिंबा दिलेल्या आमदारांची 11 मते फुटल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शिवसेनेची तीन मते फुटली. त्याचबरोबर त्यांना पाठिंबा दिलेल्या आठ अपक्षांची मते फुटल्याचे समोर आले आहे.

शिवसेनेकडे 55 मते पण मिळाली 52

शिवसेनेचे 55 सदस्य आहेत. मात्र त्यांचे उमेदवार सचिन अहीर व आमश्या पाडवी यांना प्रत्येकी 26-26 मते अशी एकूण 52 मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेची 3 मते फुटल्याचे स्पष्ट झाले असून, तीन मते गेली कुणाकडे याची चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडीची 21 मते फुटली

भाजप व त्यांना पाठिंबा दिलेल्या अपक्षांचे एकूण संख्याबळ हे 112 आहे. मात्र भाजपला पहिल्या पसंतीची एकूण 133 मते मिळाल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची 21 मते फुटल्याचे स्पष्ट आहे.

राष्ट्रवादीला 6 जादा मते

राष्ट्रवादीचे मतदानासाठी पात्र 51 आमदार आहेत. मात्र त्यांचे उमेदवार रामराजे नाईक-निंबाळकर व एकनाथ खडसे यांना मिळून 57 मते मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या हक्कांच्या मतांपेक्षा 6 ते जादा मिळाली. ही मते कुणाची याची चर्चा सुरू आहे.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही चमत्कार; ‘महाविकास’ बॅकफुटवर

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपने चमत्कार दाखवून दिला. पुरेसे संख्याबळ नसतानाही राज्यसभेत सहावी व विधान परिषदेत दहावी जागा निवडून आणून भाजपने आपले वर्चस्व दाखवून दिले.

परिवर्तनाची नांदी ः फडणवीस

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मिळालेला विजय हा भाजपसाठी अत्यंत आनंददायी दिवस आहे. ही राज्याच्या राजकारणातील परिवर्तनाची नांदी असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केली. या विजयानंतर भाजपच्या नेत्यांनी जल्लोष केला. उपस्थित नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

Back to top button