छ.संभाजीनगर: पाचोड येथे ४ लाखांची रोकड जप्त: स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई | पुढारी

छ.संभाजीनगर: पाचोड येथे ४ लाखांची रोकड जप्त: स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई

पैठण; पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठण विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहन तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. पाचोड येथील बस स्थानकासमोर एका वाहनाची झाडझडती घेतली. यावेळी ४ लाखांची रोकड आढळून आली.

जालना लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण, स्थिर सर्वेक्षण पथक प्रमुख तथा नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पैठण तालुक्यातील बिडकीन, पैठण, एमआयडीसी, विहामांडवा, लोहगाव, चितेगाव, आडुळ, बालानगर सह पाचोड परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविली.

यामध्ये पाचोड बस स्थानकासमोर शुक्रवारी सायंकाळी (MH 16 BY 5909) या कारची तपासणी केली असता यामध्ये ४ लाखांची रोकड आढळून आली. कार चालक अजित शब्बीर शेख यांने उडवा उडवीची उत्तरे दिली. पैसे कुठून आणले, या संदर्भात ठोस पुरावा सादर न केल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई सुहास पाटील, विनायक लांडगे, रंजीत सिंग दुलत, नागीनाथ केंद्रे, सचिन डिघुळे, हलगडे यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button