म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : सर्वसामान्यांच्या गळ्यावर फिरतेय सावकारी सुरी! | पुढारी

म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : सर्वसामान्यांच्या गळ्यावर फिरतेय सावकारी सुरी!

सांगली; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी केलेल्या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील खासगी सावकारीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गरिबांच्या गळ्यावर सुरा ठेऊन सावकारांकडून व्याजासाठी अव्वाच्या-सव्वा वसुली सुरू आहे. पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणा मात्र सारं काही अलबेल असल्याच्या अविर्भावात Suicides by nine peopleसल्याने गोरगरिबांनी न्याय कुठे मागायचा, असा प्रश्‍न निर्माण झााल आहे.

कागदोपत्री सावकारांची संख्या कमी आहे. मात्र खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. कमी भांडवलात भरमसाठ रक्कम मिळत असल्याने गावागावांत अगदी गल्लीबोळात सावकार तयार झाले आहेत. दरमहा 20 ते 30 टक्क्यांपर्यंत व्याजाची वसुली करून कर्जदारांना कंगाल केले जात आहे. सावकारांच्या वसुलीचा तगाद्यामुळे कित्येकांनी आपली आयुष्य यात्रा संपवली. कित्येकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तर यातून अनेक संसार रस्त्यावर आले आहेत आणि येत आहेत.

जिल्ह्यात अवैधरित्या सावकारी करणार्‍याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अवैध सावकारीचा धंदा करणार्‍या काहींनी व्याजापोटी आधीच कोर्‍या धनादेशावर सह्या किंवा जमीन, घरे, वाहने लिहून घेतली आहेत. ठराविक कालावधीचा शेत, जमिनी याबाबत दोघांमध्ये करार केला जातो. व्याज थकल्यास सावकाराकडून शिवीगाळ केली जाते. संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन धमक्या दिल्या जातात. वेळेत पैसे आले नाही तर ती जमीन किंवा वाहन काढून घेतले जाते. अपहरण करुन मारहाण केली जाते. पोलिस ठाणेस्तरावर वेळीच तक्रात घेतली जात नाही. परिणामी आत्महत्येशिवाय पर्यात राहत नाही. बेळंकी येथे वर्षापूर्वी दीड कोटीच्या कर्जासाठी एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच म्हैसाळ येथे सोमवारी अशी घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

अशी आहे शिक्षेची तरतूद

विनापरवाना सावकारी करणार्‍यांना पाच वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपयांचा दंड अशा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. याशिवाय वसुली दरम्यान सावकाराकडून मारहाण, विनयभंग अशा स्वरूपाचा गुन्हा घडल्यास त्यासाठी वेगळी शिक्षा होवू शकते.

दिलीप सावंत यांचा दणका

तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत यांनी खासगी सावकाराविरुद्ध विशेष मोहीम उघडली होती. या मोहिमेंअंतर्गत त्यांनी जिल्ह्यातील 112 सावकारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. भोल्या जाधव या सावकार टोळीला त्यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याचा हिसका दाखविला होता, पण सावंत यांच्या बदलीनंतर पुन्हा अशाप्रकारची जिल्ह्यातील कारवाई झालीच नाही.

व्यापार्‍यांना दिले जातात दिवसावर पैसे

शहरात छोटा-मोठा व्यापार करण्याची संख्या मोठी आहे. अनेक विक्रेते उदरनिर्वाह करण्यासाठी शहरात आले आहेत. अनेकांकडे पुरेसे भांडवल नसते. याचा गैरफायदा घेऊन सावकार त्यांना दिवसावर व्याजाने पैसे देतात. एक हजार रुपयांना दिवसाला शंभर रुपये व्याज आकारले जाते. आदल्या रात्री पैसे दिले जातात दुसर्‍या दिवशी सायंकाळपर्यंत व्याजासहित मूळ रक्कम सावकारांना द्यावी लागते, अन्यथा व्याज वाढवण्यात येते.

सावकारी वाढण्याची प्रमुख कारणे

जिल्ह्यातील अनेक पतसंस्था बंद अवस्थेत आहेत. राष्ट्रीयकृत, सहकारी बँका कर्ज देताना पगाराची स्लिप अथवा आयटी रिटर्न भरलेली स्लीप असल्याशिवाय कर्ज मंजूर करीत नाहीत. अनेकवेळा सामान्यांकडे या गोष्टी नसतात. केवळ तारणावर बँक अथवा पतसंस्था कर्ज देत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सावकारांचा दारात जाण्याची वेळ गरजूंवर येत आहे.

Back to top button