नाशिक सिडको : विद्यार्थ्यांनी लष्कराकडे करियर म्हणून पहावे : नवनियुक्त लेफ्टनंट घंगाळे  | पुढारी

नाशिक सिडको : विद्यार्थ्यांनी लष्कराकडे करियर म्हणून पहावे : नवनियुक्त लेफ्टनंट घंगाळे 

नाशिक (सिडको)  :  पुढारी वृत्तसेवा

लष्करी अधिकारी घडविणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात आहे. परंतु, प्रबोधिनीत महाराष्ट्रीयन टक्का कमी आहे. लष्करात युवकांसाठी खूप संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लष्कराकडे करियर म्हणून बघावे, असे आवाहन नवनियुक्त लेफ्टनंट वेदांत प्रशांत घंगाळे यांनी केले. माजी नगरसेवक प्रविण तिदमे यांनी आयोजित केलेल्या सत्काराप्रसंगी लेफ्टनंट वेदांत घंगाळे बोलत होते.

सिडको मधील प्रभाग क्रमांक ३० मधील गोविंदनगर मध्ये राहणाऱ्या वेदांत प्रशांत घंगाळे याने पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण व डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अकॅडमीत १ वर्षांचे अतीशय कठीण प्रशिक्षण घेऊन दिमाखात भारतीय सेनेत लेफ्टनंट या अतिशय महत्वाच्या पदावरती विराजमान झाले आहेत. नाशिककरांसाठी ही भूषणावह बाब आहे. त्याचमुळे, शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रविण तिदमे यांनी वेदांतचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. भारतीय लष्कराचे विजयाचे प्रतिक असलेला टी- 55 हा रणगाडा लेखानगर येथे ठेवण्यात आलेला आहे. त्याच राष्ट्रभक्ती प्रेरणा केंद्रात लेफ्टनंट वेदांत घंगाळे यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी कृष्णराव बेदडे, शरद जाखडे, प्रकाश काळे, नंदकुमार दुसानिस, वामनराव रहाणे, प्रभाकर आहिरे, राजेंद्र चौधरी व ज्येष्ठ नागरिक हजर होते. हेमंत कोठारी, संजय भालेराव, विक्रम भंाबेरे, अजय पंडित, धवल डरांगे, कुणाल उगलमूगले, निलेश शिवले आदी युवक उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button