पुरंदर: पवारवाडी येथे 36 लाखांची वीजचोरी | पुढारी

पुरंदर: पवारवाडी येथे 36 लाखांची वीजचोरी

नारायणपूर : दिवे (ता. पुरंदर) येथील पवारवाडी परिसरातील नारायण दगडू पवार (रा. पवारवाडी, ता. पुरंदर) यांच्या साईनाथ आइस फॅक्टरीमध्ये मागील 12 महिन्यांत 2 लाख 34 हजार 243 युनिटची चोरी करण्यात आली. याबाबत महावितरण कंपनीचे अधिकारी विक्रांत विलासराव सपाटे यांच्या तक्रारीनंतर सासवड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे महावितरण कंपनीचे 35 लाख 86 हजार 835 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

नारायण दगडू पवार यांनी 21 मार्च 2021 ते 23 मार्च 2022 दरम्यान चोरून वीज वापरली, हे दि. 23 मार्च 2022 रोजी महावितरणच्या पथकाने उघड केले. या दिवशी महावितरणचे अधिकारी व फिर्यादी विक्रांत सपाटे व प्रज्ञा रोकडे (सहाय्यक अभियंता), सागर जोडवे (सहाय्यक अधिकारी), गणेश कराड यांच्यासमवेत वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार पथकाने फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी तपासणीत विजेचे अधिकृत कनेक्शन आढळले, परंतु जवळील ट्रान्सफॉर्मरजवळ कोअरची अतिरिक्त वायर आढळून आली. ती वायर फॅक्टरीपर्यंत जमिनीत गाडलेली आढळली. त्याचा पंचनामा करून व्हिडीओ, क्लिप, छायाचित्रे महावितरणच्या पथकाने काढली. नंतर मुद्देमाल जप्त करून फॅक्टरीला सील केले.

दौंड: महावितरणच्या तारांचा शेतकर्‍यांना फटका

नारायण दगडू पवार यांनी 12 महिने वीजचोरी केल्याने महावितरण कंपनीचे आर्थिक मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची तडजोडीची रक्कम 19 लाख 60 हजार ठरवून पवार यांना भरण्यास सांगितले; मात्र अद्यापपर्यंत ही रक्कम भरली नसल्याने त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सासवडचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल लडकत हे करीत आहेत.

Back to top button