भंडारा : विद्युत खांबावरुन पडून मजुराचा मृत्यू; टाकला- हरदोली शिवारातील घटना | पुढारी

भंडारा : विद्युत खांबावरुन पडून मजुराचा मृत्यू; टाकला- हरदोली शिवारातील घटना

भंडारा; पुढारी वृत्तसेवा: मोहाडी तालुक्यातील टाकला येथील शेतावर विद्युत कनेक्शनसाठी नव्याने सिमेंट काँक्रिटचा विद्युत खांब उभारून विद्युत लाईनचे कनेक्शन जोडत असताना विद्युत खांब अर्धवट तुटून पडल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ११ जून) रोजी सकाळी घडली. राजू उरकुडा धार्मीक (वय ४५, रा.खरबी) असे मृत मजूराचे नाव आहे.

मोहाडी तालुक्यातील टाकला शेतशिवारात बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यालगत असलेल्या शेतशिवारात मोहाडी येथील इलेक्ट्रिक कंत्राटदार कमलेश गभ यांचे काम सुरु होते. त्या कामाअंतर्गत टाकला येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कृषी पंपाचा विद्युत पुरवठा करण्यासाठी नव्याने विद्युत खांब उभारून लाईनचे काम सुरू होते. यावेळी खांबावर चढलेला खरबी येथील कामगार राजू उरकुडा धार्मीक हा खांब तुटल्याने खाली पडला. यानंतर त्याच्या अंगावर खांब पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहीती मिळताच आंधळगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. राजू धार्मीक याच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. आता राजूचे अपघाती निधन झाल्याने त्यांची दोन्ही लहान मुलांचे छत्र हरपले आहे. या अपघाती निधनामुळे संबधित इलेक्ट्रिक कंत्राटदाराकडून आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांच्या इतर कुटुबियांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button