बारामती: गहाणखताऐवजी केले जमिनीचे खरेदीखत; जमिनीवर पतसंस्थेकडून ३४ लाख रुपयांचे कर्ज | पुढारी

बारामती: गहाणखताऐवजी केले जमिनीचे खरेदीखत; जमिनीवर पतसंस्थेकडून ३४ लाख रुपयांचे कर्ज

बारामती, पुढारी वृत्तसेवा: व्याजाने दिलेल्या २५ लाखांच्या बदल्यात ५ एकर जमिन गहाणखताने देण्याचे ठरले असताना प्रत्यक्षात या जमिनीचे खरेदीखत करून घेत फसवणूक करण्यात आली. शिवाय २५ लाख रुपयांचे व्याज उकळत तीच जमीन पतसंस्थेकडे तारण ठेवत त्यावर ३४ लाखाचे कर्ज घेण्यात आले. याप्रकरणी चौघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारकी अधिनियमासह फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमिता सुधाकर धर्माधिकारी (रा. सुपे, ता. बारामती) यांच्यासह राजेंद्र साहेबराव जगताप (रा. खंडूखैरेवाडी, ता. बारामती), झुंजार पुंडलिक चांदगुडे (रा. दापोडी चौफुला, ता. दौंड) आणि अप्पासाहेब विश्वास शिंदे (रा. अंतवाडी, ता. कराड, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा नगरपरिषदेचा ठराव

याबाबत सुपे येथील रेखा चंद्रकांत चांदगुडे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार २३ मार्च २०१५ ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत सुपे येथे ही घटना घडली. फिर्यादी यांचा मुलगा सुधीर यास धर्माधिकारी याने भागीदारात सराफी दुकान टाकू, असे आश्वासन दिले होते. त्या बदल्यात फिर्यादीची पानसरेवाडी गावच्या हद्दीतील जमीन गट क्रमांक ३४५ मधील पाच एकर क्षेत्र जगताप यांच्यामार्फत चांदगुडे व शिंदे यांना २५ लाख रुपयांना गहाणखताने देण्याचे ठरले. परंतु त्यांनी गहाणखताऐवजी खरेदीखत केले. त्यांच्याकडे कोणताही सावकारकीचा परवाना नसताना फिर्यादीच्या मुलाने त्यांना २५ लाखांपेक्षा अधिक व्याज दिले. तरीही पैसे द्या नाही तर तुमच्याकडे बघून घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली. तसेच पाच एकर जमीन परत न करता फसवणूक करत या जमिनीवर एका पतसंस्थेकडून ३४ लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button