गांधी कुटुंबियांना ईडी समन्स; कॉंग्रेस आक्रमक, उद्या देशभरात पत्रकार परिषदांचे आयोजन | पुढारी

गांधी कुटुंबियांना ईडी समन्स; कॉंग्रेस आक्रमक, उद्या देशभरात पत्रकार परिषदांचे आयोजन

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्यानंतर कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. रविवारी (दि. 12 ) या मुद्दयावर कॉंग्रेसतर्फे देशभरात पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाची लागण झाल्याने सोनिया गांधी उपचार घेत आहेत. २३ जून रोजी त्या ईडी समक्ष हजर राहतील. यापूर्वी त्यांना ८ जून ला ईडी कार्यालयात हजर राहण्यासंबंधी समन्स बजावण्यात आला होता. तर, सोमवारी १३ जून रोजी राहुल गांधी ईडीसमक्ष नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी त्यांचा जबाब नोंदवतील.

भाजप ईडीच्‍या माध्‍यमातून सोनिया तसेच राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. यासंबंधी कॉंग्रेसकडून शांतीपूर्णरित्या आंदोलन केले जाईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या सर्व राष्ट्रीय नेत्यांना दिल्ली मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोमवारी केंद्रातील मोदी सरकारविरोधात कॉंग्रेसकडून विरोध प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सोनिया,राहुल गांधी यांना अटक करण्याची ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ची मागणी

नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात गैरव्यवहारप्रकरणी सोनिया व राहुल गांधी यांना अटक करण्याची मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केली. यासंबंधी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, त्यांना निवेदन सादर करू,असे प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी कळवले आहे. भष्ट्राचार करणाऱ्या प्रत्येक नेत्यांवर समान न्यायाने कारवाई केली पाहिजे.जनसेवकच अशाप्रकारे अपहार करतील, तर देशातून भष्ट्राचार हद्दपार होणार नाही.अशा नेत्यांवर त्यामुळे कडक कायदेशी कारवाई केली पाहिजे,अशी विनंती पंतप्रधानांकडे करणार असल्याचे पाटील म्हणाले.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button