सापाने केली चक्क सापाचीच शिकार | पुढारी

सापाने केली चक्क सापाचीच शिकार

राहुरी : पुढारी वृत्तसेवा:  सापाने बेडूक गिळला. हे आपण कायमच पाहतो किंवा ऐकतो. मात्र, विश्वास न बसणारी व नवल वाटणारी आणि चित्रपटाला शोभेल अशी एक घटना घडली. राहुरी शहरातील मुलनमाथा येथे चक्क एका सापाने दुसर्‍या सापाला पूर्णपणे गिळून घेतल्याचा प्रकार घडला.

राहुरी शहरातील मुलनमाथा येथे राहात असलेले हौशीनाथ जगधने यांच्या घराजवळ सकाळी 7 वाजता दगडामध्ये दोन साप असल्याचे हौशीनाथ जगधने यांनी पाहिले. दोन साप समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात चित्रपटाला शोभेल अशी झुंज लागली. बराच वेळ त्यांची झुंज सुरू होती. जगधने यांनी ताबडतोब राहुरी शहरातील सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना फोन करून बोलावून घेतले.

सर्पमित्र कृष्णा पोपळघट, सर्पमित्र मुजीब देशमुख, रोहित जगधने हे काही वेळात तिथे हजर झाले. त्यांनी बघितले की, दोन्ही सापांची झुंज झाल्यानंतर देशातील सर्वात विषारी जातीचा मण्यार सापाने बिनविषारी जातीच्या कवड्या सापाची शिकार करून त्याला गिळत असल्याचे दिसले. सर्प मित्रांनी त्याची शिकार पूर्णपणे गिळू दिली व नंतर त्याला ताब्यात घेऊन निसर्गात सोडून दिले.

यावेळी परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सर्प मित्रांनी केले. तसेच सदर ठिकाणी लहान मुले अधिक असल्याने पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेऊन त्यांना अडचणीच्या ठिकाणी हात घालण्यापासून थांबवावे, असे सांगण्यात आले.
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना व प्रसंग नागरिकांना पहिल्यांदाच बघायला मिळाल्याने सर्व जण आश्चर्य चकीत झाले होते.

Back to top button