Wedding : विधवा वहिनी सोबत दिराने केला विवाह ; दोन लहान मुलांचा देखील करणार सांभाळ ! | पुढारी

Wedding : विधवा वहिनी सोबत दिराने केला विवाह ; दोन लहान मुलांचा देखील करणार सांभाळ !

धुळे : पुढारी वृत्तसेवा :

येथील काशी कापडी समाजातील अशोक कापसे यांची विधवा मुलगी कल्याणी व सटाणा येथील अंकुश वाटेकर यांचा घटस्फोटीत मुलगा सुनिल यांचा विवाह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने धुळे येथील अग्रवाल भवनात नुकताच संपन्न झाला. विधवा वहिनीची मुलगी कु. समृध्दी व चि. साई या दोन लहान मुलांचा सांभाळ देखील यानिमित्ताने होणार आहे. (Wedding)

नववधू कल्याणी हिचे पहिले पती योगेश वाटेकर यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तर वर सुनिल हे घटस्फोटीत असून भारतीय सैन्य दलात पंजाब येथे नायक पदावर कार्यरत आहेत. दोन्हीकडील कुटुंबीयांनी या विवाह सोहळ्यास होकार देण्यासाठी अखिल भारतीय काशी कापडी समाजाच्या महिला उपाध्यक्षा कोमल वरदे यांनी परिश्रम घेतले. कोमल वरदे यांनी धुळे येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. महाराष्ट्र  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील व कायदेशीर सल्लागार अॅड. विनोद बोरसे यांनी काशी कापडी समाजाचे पंचमंडळाचे अध्यक्ष संजय वाडेकर व पंचमंडळाशी चर्चा केली. काशी  कापडी पंच मंडळ, धुळे यांचा पाठिंबा व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने हा अनोखा विवाह (Wedding) संप्पन झाला.

वराचे मामा राजेंद्र कापसे तसेच नववधूचे मामा मोहन शारकर यांच्यासह दोन्ही कडील नातेवाईकांचे सहकार्य लाभले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वर, वधु, त्यांचे आई-वडील, पंचमंडळ व उपस्थित  मान्यवरांचा प्रबोधनपर पुस्तकं व  गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विवाह सोहळ्यास अखिल  भारतीय काशी कापडी समाजाच्या  महिला उपाध्यक्षा कोमल वरदे,  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, कायदेशीर सल्लागार अॅड. विनोद बोरसे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुरेश बिऱ्हाडे, बुवाबाजी संघर्ष विभागाचे नितीन बागुल, पुर्ण वेळ कार्यकर्ते  नवल ठाकरे यांच्यासह माजी महापौर प्रदीप कर्पे, नगरसेविका मंगला चौधरी, काशी कापडी समाज पंचमंडळ  अध्यक्ष  संजय वाडेकर,  उपाध्यक्ष दिनकर कापसे, सहसचिव मोहन कापसे तसेच प्रकाश कापसे,  प्रल्हाद कापसे, सखाराम कर्पे, राजु कापसे, रविंद्र कापसे, गणेश सुधारक, संजय कर्पे,  विठ्ठल कापसे, किशोर कापसे,  कचरू कापसे आदी पंचमंडळ व  काशी कापडी समाज बांधव उपस्थित होते.

विधवा प्रथांचे निर्मूलन व्हावे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात हा विधवा विवाह धुळे येथे संपन्न होत आहे. त्यामुळे विधवा विवाहास प्रोत्साहन देऊन त्यामाध्यमातून विधवा प्रथांचे निर्मूलन व्हावे!
– अविनाश पाटील, राज्यकार्याध्यक्ष , महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

काशी कापडी समाज प्रबोधनासाठी प्रयत्नशील

काशी कापडी समाज हा एक भटका समाज असून समाजात आज देखील अनेक ठिकाणी अनिष्ट रूढी परंपरा पाळल्या जात आहेत. त्यामुळे मी माझ्या समाज प्रबोधनासाठी सतत प्रयत्नशील राहीन !
– कोमल वरदे, महिला उपाध्यक्षा, अखिल भारतीय काशी कापडी समाज.

हेही वाचा :

Back to top button