टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा
मलठण (ता. शिरूर) परिसरामध्ये शेतकर्यांच्या घोडे, शेळ्या-मेंढ्या या पाळीव प्राण्यांवर हल्ले करणारा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात जेरबंद झाला. बिबट्याच्या हल्ल्यांबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला कळविले होते. शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सूचना दिल्यानंतर परिमंडळ अधिकारी गणेश म्हेत्रे, वनरक्षक ऋषिकेश लाड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड यांनी गितेमळा येथे पिंजरा लावला.
सावजाच्या शोधात आलेला बिबट्या पिंजर्यात अडकला. टाकळी हाजी परिसरातील उचाळेवस्ती, साबळेवाडी, माळवाडी, शिनगरवाडी, तामखरवाडी, टेमकरवाडी, गावडेमळा या भागांतदेखील अनेकदा बिबट्यांचे दर्शन होत आहे. उचाळेवस्ती येथील प्रत्यक्षदर्शीने गुरुवारी रात्री वाघ पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी रात्रीच्या वेळेस शेतात पाणी देताना एकट्याने जाऊ नये. रात्रीच्या वेळी फिरताना काठी, टॉर्च बाळगावा. बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन ठार झाले असल्यास त्याची माहिती तत्काळ वन विभागास कळवावी. नागरिकांच्या मागणीनुसार पिंजरा लावण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.