नाशिक : विमानतळ रस्त्यावरील दुभाजक ठरतोय मृत्यूचे कारण | पुढारी

नाशिक : विमानतळ रस्त्यावरील दुभाजक ठरतोय मृत्यूचे कारण

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा :

येथील विमानतळ हे नाशिकरांसाठी एक अभिमानास्पद बाब असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील दहावा मैल ते विमानतळ रस्ता मात्र वाहनधारकांसाठी असुरक्षित असल्याचे समोर येत आहे. येथील संपूर्ण रस्त्याचे काम करतांना संबंधित विभागाने रहदारी व उपरस्ते लक्षात घेवून रस्ता ओलांडण्यासाठी मयार्दीत प्रमाणातच दुभाजक लावणे आवश्यक असताना संबंधित विभागाने आवश्यकतेपेक्षा जास्त दुभाजक लावले आहेत. ते वाहनधारकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे निर्दशनास येत आहे.

फ्रेशट्रॉप कंपनीच्या प्रवेशव्दारासमोरील रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजक लावण्यात आले आहे. या प्रवेशव्दारामधून येणार्‍या वाहनांना दुस-या बाजूकडून रस्त्याने येणार्‍या वाहनाचा अंदाज येत नसल्याने संभाव्य अपघात होण्याची शक्यता आहे. येथील छोट्या अपघाताच्या सत्रात वाढ झाली असून एखाद्याचा बळी गेल्यावरच संबंधित विभागाला जाग येईल की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. दहावा मैल ते विमानतळ रस्त्यासाठी शेतकर्‍यांच्या मालकीच्या जमिनीचे अधिग्रहण लवकर न झाल्याने रस्त्याच्या प्रतिक्षेत रहावे लागले हाेते. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या या विमानतळाला सत्तांतरानंतर पाच वर्ष रस्ता तयार होण्यासाठी वाट बघावी लागली. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी रस्त्याचे कामकात पूर्णत्वास आले. परंतु या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत धोकादायक स्थिती असून रस्त्यावर औद्योगिक वसाहत असल्याने अनेक कंपन्याही वसलेल्या आहेत. त्यातील  बहुतेक कंपन्या वरिष्ठ पातळीवर संबंध असलेल्या वशिल्याबाजील्याच्या कंपन्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे फ्रेशट्रॉप कंपनी होय. या कंपनीच्या प्रवेशव्दारासमोरच रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजक ठेवले आहेत. कंपनीत येणार्‍या वाहनांसाठी हा दुभाजक सोयीस्कर ठरत असला तरी वाहनधारकांसाठी मात्र हा दुभाजक जीवघेणा ठरत आहे. कंपनीच्या दोन्ही बाजूला काही ठराविक अंतरावर विशिष्ट ठिकाणी रहदारीच्या दृष्टीकोनातून रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजक लावण्यात आले आहेत. संबंधित विभागाने अपघातग्रस्त व मृत्यूला आमंत्रण देणार्‍या रस्ता दुभाजक तत्काळ हटवून नियमाप्रमाणे कंपनीला थोड्या अंतरावर दुभाजकांची व्यवस्था करुन द्यावी, अशी मागणी होत आहे. दुभाजकामुळे एखाद्याचा बळी गेल्यास त्यास सर्वस्वी संबंधित विभाग व कंपनी व्यवस्थापकास जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

संबंधित विभागाचे वैयक्तिक संबंध वाहनधारकांच्या जीवावर – नियमाप्रमाणे उपरस्ते व रहदारीचा दृष्टीकोन समोर ठेवून रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजक तयार करण्यात येतात. परंतु संबंधित विभागाने दुभाजकांची निर्मिती करतांना वैयक्तिक संबंध जोपासल्याचे दिसून येते. दहावा मैल ते विमानतळ रस्त्यावरील फ्रेशट्रॉप कंपनीत दिवसभरात अवजड वाहतूकीचे मोठ्या प्रमाणात वाहने येतात. त्या वाहनांना रस्ता ओलांडण्यासाठी सोयीस्कर व्हावे. यासाठी कंपनीच्या प्रवेशव्दारा समोरच रस्ता दुभाजकांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही कंपनी पूर्णत: रस्त्याच्या बाजूला असल्याने गेटच्या बाहेरून येणार्‍या वाहनांना समोरील वाहन दिसत नाही.  कंपनीपासून 100 मीटरवर 17 नंबर फाटा आहे. तेथून कंपनीपर्यंत पूर्णत: रस्त्याला उतार आहे. त्यामुळे वाहने वेगाने येतात. त्यामुळे येथे वारंवार छोटे अपघात होत आहेत.
दहावा मैल ते विमानतळ रस्ता हा धोकादायक ठरत आहे. भरधाव वाहनाचा वेग जास्त असतो व अचानक एखाद्या ठिकाणी आडवे वाहन आल्यास वाहधारकांची तारांबळ उडते. त्यातून लहान मोठे अपघात होणे कायमचेच झाले आहे. रस्त्याच्या नियमानुसार दुभाजक होणे आवश्यक असतांना वशिलेबाजीनुसार ठेवलेले हे दुभाजक वाहनधारकांना मृत्यूला आमंत्रण देत आहे. – हर्षल काठे,  सामाजिक कार्यकर्ते, जानोरी.

हेही वाचा :

Back to top button