व्हॉटस्अ‍ॅपवर आलेले ‘मेटा एआय’ फीचर आहे तरी काय? | पुढारी

व्हॉटस्अ‍ॅपवर आलेले ‘मेटा एआय’ फीचर आहे तरी काय?

न्यूयॉर्क ः सध्याचं जग हे तंत्रज्ञानाचं असून यामुळे आपलं जगणं आणखी सोपं झालं आहे. तंत्रज्ञानाच्या या जगात आता कृत्रिम बुद्धिमत्तेनं प्रवेश केला असून या नव्या तंत्राने तर सगळे मापदंडच मोडून काढून काढले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर कठीणातील कठीण काम चुटकीसरशी होत आहे. चॅट जीपीटी हेदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावरच आलेलं तंत्रज्ञान आहे.

गणिताचा प्रश्न असो की आपल्या आरोग्याशी निगडित एखादी अडचण असो, चॅट जीपीटीला प्रश्न विचारल्यावर आपल्याला त्याची वेगवेगळी उत्तरं भेटतात. दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अ‍ॅपची मालकी असलेल्या मेटा या कंपनीने मेटा एआय नावाचं नवं फीचर आणलं आहे. ज्याला तुम्ही चॅट जीपीटीप्रमाणेच सगळं काही विचारू शकता. हे फीचर अनेकांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर दिसत आहे.

मेटा चे ‘मेटा एआय’ हे फीचर याआधीच अनेक देशात चालू आहे. यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, घाना, न्यूझिलंड, नायजेरिया, पाकिस्तान, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, युगांडा, झांबिया, झिंम्बाब्वे या देशांचा समावेश आहे. हे फीचर आता भारतातही आले असून सध्या ते प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्यात आले आहे. या फीचरचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी करता येतो. अनेकांच्या अपडेटेड व्हॉटस्अ‍ॅपवर सध्या मेटा एआय नावाचे नवे फीचर दिसत आहे. व्हॉटस्अ‍ॅपच्या उजव्या कोपर्‍यात न्यू चॅट ऑप्शनच्या वर निळ्या-जांभळ्या रंगाचं एक वर्तुळ दिसत आहे. ते वर्तुळ म्हणजेच नव्याने लॉन्च झालेले मेटा एआय हे फीचर आहे.

या फीचरवर तुम्ही क्लीक केल्यावर चॅटिंगचा ऑप्शन खुला होतो. एखाद्या व्यक्तीला आपण ज्या पद्धतीने मेसेज करतो, अगदी त्याच पद्धतीने संदेशाच्या माध्यमातून या मेटा एआयला आपण वेगवेगळे प्रश्न विचारायचे. त्यानंतर मेटा एआय आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतं. मेटा एआयला काही विचारायचे असल्यास तुम्ही चॅट्स ऑप्शनमध्ये जाऊन वर सर्च बारमध्ये ‘अ‍ॅट मेटाएआय’ असं सर्च करू शकता. त्यानंतर लगेच तुम्हाला मेटा एआयशी चॅटिंगच्या मदतीने संवाद साधता येईल. मेटा एआय सध्यातरी शक्य त्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देत आहे.

विशेष म्हणजे तुम्हाला एखादी इमेज हवी असेल तर तुम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे ‘मेटा एआय’ तुम्हाला इमेजदेखील तयार करून देतं. ही नवी इमेज आपल्याला अवघ्या काही सेकंदांत तयार करून मिळते. या फीचरच्या मदतीने तुम्हाला हवा असलेला फोटो तयार करून तो इतरांना शेअरही करू शकता. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सध्या हा ऑप्शन सर्वच व्हॉटस्अ‍ॅपवर उपलब्ध नाही. हळूहळू सर्व वापरकर्त्यांना हा पर्याय उपलब्ध होणार आहे. इन्स्टाग्रामवरही मेटा एआय वापरता येत आहे.

Back to top button