विदेशी झाडे तापमानवाढीला ठरतात कारणीभूत ; अभ्यासकांचा दावा | पुढारी

विदेशी झाडे तापमानवाढीला ठरतात कारणीभूत ; अभ्यासकांचा दावा

नाशिक : सतीश डोंगरे
महाबळेश्वरपेक्षाही थंड हवेचे ठिकाण म्हणून नाशिकचा उल्लेख केला गेला. मात्र, यंदाची उष्णता बघता यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. नाशिककरांना कधीही फारसा उन्हाळा जाणवला नाही. यंदा मात्र नाशिकचा पारा 41 अंशांवर गेल्याने नाशिककरांचा चांगलाच घाम निघाला. आता यामागची कारणे शोधली जात असून, परदेशी वृक्ष हेहीदेखील तापमान वाढीमागील प्रमुख कारण असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

नाशिकसह देशात मार्च आणि एप्रिल महिन्यातील तापमानाने अनेक रेकॉर्ड मोडले. विदर्भ तर अक्षरश: होरपळून निघत आहे. यामागे परदेशी वृक्ष हे कारण असल्याचा आता दावा केला जात असून, भारतात 15 हजारांपेक्षा अधिक झाडांच्या प्रजाती या परदेशी असल्याचे अभ्यासाअंती समोर आले आहे. अभ्यासकांच्या मते ऐन उन्हाळ्यात परदेशी झाडांची मोठ्या प्रमाणात पानगळ होत असते. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात. यामुळे जमिनीची उष्णता वाढते आणि तापमानात बदल होतो. परदेशी झाडांपैकी 55 टक्के झाडांच्या प्रजाती या मूळ अमेरीकेतील आहेत. बॉटनिक गार्डनच्या विकासासाठी इंग्रजांच्या काळात आपल्याकडे परदेशी झाडे आणली गेली आणि तेच पुढील काळातदेखील चालत राहिले. मात्र, याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचाही दावा अभ्यासकांनी केला आहे.

मादागास्कर येथून भारतात आलेला गुलमोहर, ऑस्ट्रेलियातून आलेले निलगिरी, आयात केलेल्या गव्हाबरोबर सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडिया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे. या झाडांच्या फुलात परागकण नाहीत. त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत. या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाणही कमी होत आहे. रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणार्‍या पक्ष्यांचा वावर दुर्मीळ झाला आहे. याउलट देशी वृक्ष जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. पक्ष्यांना, किड्यांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा देतात. देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणार्‍या पाचोळ्यातून तयार होणार्‍या खतातून जमिनीचा कस वाढतो. त्यामुळे विदेशी झाडांऐवजी सगळ्यांनी देशी झाडांची लागवड करण्यास प्राधान्य द्यावे.

पावसाळ्यात लावा ही झाडे
येत्या पावसाळ्यात देशी झाडांची लागवड करावी. त्यामध्ये पांगरा, सावर, सीताफळ, जांभूळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस, आवळा, आंबा, कवठ, बेल, कडुनिंब मोह, पळस, चिकू, बोर, पिप्रण, नांदरूक, मोहा या झाडांचा समावेश असावा.

वड, पिंपळ, देशी चिंच, कडुलिंब, देशी बाभूळ या डेरेदार झाडांचीच लागवड केल्यास, निसर्ग समतोलास मदत होईल. पानगळ ही सर्वच झाडांची कमी-अधिक प्रमाणात होत असते. त्यामुळे पानगळीमुळे जमिनीची उष्णता वाढते, हा दावा निराधार आहे. याउलट निलगिरी हे झाड प्रचंड घातकी असून, ते काढून टाकल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल. त्याऐवजी डेरेदार झाडांची लागवड करावी.
किरणकुमार जोहरे, हवामान तज्ज्ञ

हेही वाचा :

Back to top button