सातारा : प्रभाग रचना प्रस्ताव आज आयुक्‍तांकडे | पुढारी

सातारा : प्रभाग रचना प्रस्ताव आज आयुक्‍तांकडे

सातारा : पुढारी वृत्तसेवा
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील जि. प. गट व पं. स. गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सोमवार, दि. 23 मे रोजी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्‍तांकडे सादर करणार आहेत. विभागीय आयुक्‍त या प्रस्तावाला दि. 31 मेपर्यंत मान्यता देणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 2011 च्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे सातारा जिल्हा परिषदेसाठी सदस्य संख्या निश्‍चित केली आहे. निवडणूक आयुक्‍तांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या आता 73 होणार आहे. पूर्वी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 64 होती. त्यामध्ये वाई 1, फलटण 2, खटाव 2, कोरेगाव 1, कराड 2 व पाटण 1 अशा 9 गटांची नव्याने वाढ झाली आहे. त्यामुळे या तालुक्यात पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढली आहे. प्रभाग रचना व आरक्षण सोडत झाल्यानंतर महाबळेश्‍वरमधील 2 गट व 4 गण, वाईतील 5 गट व 10 गण, जावलीतील 3 गट 6 गण, फलटणमधील 9 गट व 18 गण, माणमधील 5 गट व 10 गण, खटावमधील 8 गट व 16 गण, कोरेगावमधील 6 गट व 12 गण तर सातारा तालुक्यातील 10 गट व 20 गणांमध्ये धूमशान होेणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी सादर करण्याच्या सूचना निवडणूक आयुक्‍तांनी दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी हे विभागीय आयुक्‍तांकडे हा प्रस्ताव सादर करणार आहेत. आयुक्‍तांनी अवलोकन केल्यानंतर किंवा बदल सुचवून 31 मे पर्यंत प्रस्तावास मान्यता देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्‍तांनी प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी यासाठी अधिसूचना प्रसिध्द करावी. त्यानंतर नागरिकांच्या हरकती व आक्षेप मागवून घेणार आहेत. यावर सुनावणी होवून दि. 22 पर्यंत अंतिम प्रभाग रचनेसाठी हा प्रस्ताव पुन्हा आयुक्‍तांकडे जाणार आहे. त्यानंतर दि. 27 रोजी याला मान्यता दिल्यानंतर अंतिम प्रभाग रचना होणार आहे.

Back to top button