कोल्हापूर; विकास कांबळे : प्रभाग क्रमांक 15 मध्ये पूर्वीच्या विक्रमनगर, टेंबलाईवाडी व शिवाजी विद्यापीठ या तीन वॉर्डांचा समावेश आहे. पूर्वेकडून शहराची हद्द सुरू होते तेथून ते सायबर चौकापर्यंत या प्रभागाचा विस्तार आहे. सायबर चौकापर्यंत प्रभागाचा विस्तार असला, तरी मतदारांची संख्या प्रामुख्याने विक्रमनगर, टेंबलाईवाडीतीलच आहे. गुंठेवारी, इनाम जमिनीमुळे शासन हक्काची सातबार्यावर झालेली नोंद हा गंभीर प्रश्न या प्रभागात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून आहे. याशिवाय अस्वच्छता, पाण्याचा प्रश्न अधूनमधून सतत डोके वर काढत असतो. त्यात भर म्हणून ओढ्यावर आयआरबीने केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात दरवर्षी 40 ते 50 घरांमध्ये पाणी घुसते. या भागात रस्त्यांची स्थिती मात्र चांगली आहे. टेंबवाईवाडी येथील शाळा चांगली आहे; मात्र दवाखान्यात मिळणार्या सेवा रामभरोसे आहेत.
टेंबलाईवाडी, विक्रमनगर शहराच्या पूर्वेकडील पहिले उपनगर. कामगार, कष्टकर्यांची ही वस्ती आहे. दोन कारखाने आणि मार्केट यार्ड यामुळेच या परिसरात काष्टकर्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी लोक घरे बांधून राहिली आहेत. बहुतांश जागा गुंठेवारीतील असल्यामुळे अजूनही या जागा नावावर होऊ शकलेल्या नाहीत. त्यात भर म्हणून इनाम जमिनीचा प्रश्न आवासून उभा आहे. ज्या दिवशी जागा खरेदी केली (म्हणजे शर्थभंग झाला) त्यादिवशीच्या बाजारभावाच्या मूल्याच्या 25 टक्के रक्कम भरण्यास नागरिक तयार आहेत. परंतु, चालू बाजारभावाच्या रकमेच्या 75 टक्के रक्कम भरावी, अशी शासनाची भूमिका आहे. शासनाच्या या भूमिकेमुळे 'खरेदी लाखाची' आणि 'दंड दीड लाखाचा' अशी स्थिती होत असल्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षांपासून हा प्रश्न तसाच आहे.
या प्रभागात ड्रेनेजची व्यवस्थाच नसल्यामुळे नवदुर्गापासून येणारे सांडपाणी जोशी गल्लीच्या पुढे तुंबते. त्याला पुढे जाण्यास वाटच नाही. टेंबलाईवाडीतदेखील तशीच स्थिती आहे. त्यामुळे या परिसरात अधूनमधून साथ पसरत असते. भागातील रस्ते चांगले झाले; परंतु ड्रेनेजचा प्रश्न मात्र गंभीर आहे. ठिकठिकाणी पाणी साचत असते. जोशी गल्ली, लक्ष्मी कॉलनीचा पुढील भाग येथे हे पाणी उघड्यावर पसरत असते.
विक्रमनगर, टेंबलाईवाडी परिसरात पूर्वी शेतवड होती. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा होती. जागा मोकळी असल्यापासून येथील तरुण क्रीडांगणाची मागणी करत आहेत. परंतु, टिंबर मार्केटसाठी आरक्षित ठेवलेली जागा महापालिकेने आयआरबीला दिली. या ठिकाणी अजून जागा शिल्लक आहे. परंतु, या जमिनींवर काही जणांचा डोळा आहे.
लोकप्रतिनिधींनादेखील क्रीडांगण व्हावे, असे वाटत नसल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही. सार्वजनिक शौचालयांची संख्या या प्रभागात मोठी आहे. परंतु, त्याच्या दुरुस्तीकडे आणि स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. काही ठिकाणी पुरेसा पाणी पुरवठा होतो; मात्र काही भागात सतत पाणी पुरवठ्याच्या तक्रारी असतात. आयआरबीच्या बांधकामामुळे या परिसरातील नागरिकांची पावसाळ्यात नवीनच डोकेदुखी झाली आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरत असते. महापालिकेच्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या चांगल्या शाळा आहेत. त्यात टेंबलाईवाडी शाळेचा वरचा क्रमांक लागतो. येथील शिक्षक त्यासाठी परिश्रम घेत असून लोकप्रतिनिधी त्यांना लागेल ती मदत करत असतात. वीज व रस्त्यांची स्थिती या भागात चांगली आहे. या प्रभागाची लोकसंख्या 17 हजार 983 इतकी आहे.
विक्रमनगर, टेंबलाईवाडीतील जागेवर शासकीय बोजा
जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात अनेक ठिकाणी इनाम जमिनीचा प्रश्न आहे. परंतु, कोणाच्याही मिळकतीवर शासकीय बोजा नोंदविण्यात आलेला नाही. केवळ विक्रमनगर व टेंबलाईवाडी येथील मिळकतींवरील सातबार्यावरच शासकीय हक्काची नोंद करण्यात आली आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
प्रभाग क्र. 15 ची व्याप्ती…
या प्रभागात विक्रमनगर, टेंबलाईवाडीसह मिलिट्री कॅम्प, कृषी महाविद्यालय, टेंबलाई मंदिर, रेल्वे उड्डाण पूल, उचगाव जकात नाका, राजाराम कॉलेज परिसराचा समावेश आहे.
भागातील सर्व गल्लीतील रस्ते, गटारींची कामे पूर्ण झाली आहेत. अंतर्गत पाईपलाईन बदलण्यात आली आहे. ऑक्सिजन पार्क उभारण्यात आला आहे. गुंठेवारी व इनाम जमिनीचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विक्रमनगर मुख्य रस्ता होणे आवश्यक आहे. क्रीडांगणासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या या भागात त्याची आवश्यकता आहे.
– शोभा कवाळे, माजी नगरसेविका, विक्रमनगर
विक्रमनगर, टेंबलाईवाडीची वाढती लोकसंख्या व पाण्याचा वापर लक्षात घेता पाण्याच्या टाकीची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. येथील लोकवस्ती पाहता आरोग्य केंद्रात डॉक्टर व औषधांची सोय उपलब्ध करू द्यावी.
– शांतीजित कदम, सामाजिक कार्यकर्ते
प्रभागातील अंतर्गत रस्ते सिमेंट-काँक्रिटचे केले. संपूर्ण गटर व चॅनेलचे काम केले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब बसविले आहेत. या प्रभागात सार्वजनिक शौचालय प्रथमच आपण आपल्या कारकिर्दीत बांधले. भागातील तरुणांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही. ते होणे आवश्यक आहे.
– कमलाकर भोपळे, माजी नगरसेवक, टेंबलाईवाडी