Nashik News | आता पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा लागणार हिशेब! मनपा करणार स्काडा मीटर प्रणालीचा वापर | पुढारी

Nashik News | आता पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा लागणार हिशेब! मनपा करणार स्काडा मीटर प्रणालीचा वापर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ४० टक्के हिशेबबाह्य पाणीवापरामुळे टीकेची धनी बनलेल्या नाशिक महापालिकेने आता धरणातून जलकुंभांपर्यंत पुरविण्यात येणाऱ्या थेंब अन‌् थेंब पाण्याचा हिशेब लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्काडा मीटर प्रणालीचा अवलंब केला जात असून, धरणावरील पंपिंग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्र तसेच जलकुंभांच्या ठिकाणी सेन्सर बसविण्यात येत आहेत.

महापालिकेतर्फे शहरात पाणीपुरवठा केला जातो. यासाठी धरणांतून उचलण्यात येणाऱ्या पाण्यासाठी महापालिका जलसंपदा विभागाला पाणीपट्टी अदा करते. तर घरोघरी पाणीपुरवठा केल्यानंतर नळकनेक्शन धारकांकडून महापालिका पाणीपट्टी वसूल करते. धरणातून उचलण्यात येत असलेल्या एकूण पाण्याच्या तुलनेत पाणीपट्टीतून येणारा महसूल कमी असून, ४० टक्के पाणीवापर हिशेबबाह्य असल्याचे महापालिकेने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले होते. या पाण्याचा हिशेब लावण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून महापालिकेने स्काडा मीटर प्रणालीचा अवलंब केला आहे. गावठाण पुनर्विकास योजनेअंतर्गत २४ तास पाणीपुरवठ्याची योजना हाती घेण्यात येत आहे. यासाठी पंचवटी व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचा पुनर्विकासही केला जात आहे. पुनर्विकासासाठी मृदा चाचणी व नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या आरेखन करण्यात आले आहे. गावठाणात पाणीपुरवठा करण्यासाठी स्काडा प्रणाली वापरली जात आहे.

स्काडा प्रणालीसाठी डेटा संकलन करण्यासाठी महापालिकेच्या ११० जलकुंभांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. स्काडा प्रणालीत व्यावसायिक पाण्याचे मीटर बसविण्यासाठी साठ ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण करून जवळपास दहा हजार मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता पुढील टप्प्यात ११५ जलकुंभ, सात जलशुद्धीकरण केंद्रे, आठ पंपिंग स्टेशनमधील यंत्रांवर स्काडा मीटर बरोबरच फ्लो मीटर सेन्सर बसविले जाणार आहे. जलकुंभ, पंपिंग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्राद्वारे वितरित पाणी, शुद्ध होऊन वितरित होणारे पाणी, स्वच्छ पाणी, पाण्याची पातळी, पाण्याचा वेग, पाण्याचा दाब, पाण्यातील क्लोरिनचे घटक या घटकांची फ्लो मीटर सेन्सरद्वारे तपासणी होणार आहे.

येथे बसणार ‘फ्लो सेन्सर’ मीटर

* शहरातील ११० जलकुंभ

* शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र

* गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र

* नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र

* बोरगड पंपिंग स्टेशन

* बुधवार पेठ पंपिंग स्टेशन

* चेहेडी बंधारा पंपिंग स्टेशन

* द्वारका पंपिंग स्टेशन

* गोपालनगर पंपिंग स्टेशन

* नवीन चुंचाळे पंपिंग स्टेशन

– जुने चुंचाळे पंपिंग स्टेशन

– सावतानगर पंपिंग स्टेशन

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ४० टक्के पाणीवापर हिशेबबाह्य असल्याचे आढळून आले आहे. यामुळे पाणीपुरवठा व्यवस्था तोट्यात असल्याने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब लागण्यासाठी स्काडा मीटर प्रणालीचा अवलंब केला जात आहे. याअंतर्गत पंपिंग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्र तसेच जलकुंभांच्या ठिकाणी पाण्याची मोजणी करणारे फ्लो मीटर सेन्सर बसविण्यात येत आहेत.

– अविनाश धनाईत, अधीक्षक अभियंता, यांत्रिकी विभाग

हेही वाचा –

Back to top button