चंद्रपूर : हातउसने घेतलेल्या पैशाच्या भांडणातून तंटामुक्त समिती अध्यक्षाची हत्या | पुढारी

चंद्रपूर : हातउसने घेतलेल्या पैशाच्या भांडणातून तंटामुक्त समिती अध्यक्षाची हत्या

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : हातउसने घेतलेले पैसे परत करण्यास विलंब केल्याने झालेल्या भांडणातून १९ वर्षीय मित्राने तंटामुक्त समिती अध्यक्षाचा दगड आणि स्टिल रॉडने जबर मारहाण करून निर्घूण हत्याची केल्याची कबुली दिली. एका आरोपीसह एका विधी संघर्ष बालकास पोलिसांनी संशयीत म्हणून ताब्यात घेतले होते. त्यानंतर केलेल्या चौकशीत त्यांनी खून केल्याचे मान्य केले. ही घटना चंदपूर जिल्ह्यातील शेगाव बुज. येथे घडली आहे. महेश बबनराव घोडमारे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. तर आरोपी स्वप्नील चौधरी (वय १९) व एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरोरा तालुक्यातील महेश बबनराव घोडमारे (वय ३०, रा. शेगाव बुज. ) हे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ग्रामस्तरावर होणारे किरकोळ भांडणतंटे मार्गी लावण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. यासोबत सामाजिक कार्य म्हणून नागरिकांचे विविध कामे ते करून द्यायचे त्यामुळे ते सर्वपरिचित होते. मागील तीन- चार दिवसांपासून महेश घोडमारे हे काही कामानिमित्य बाहेर गावी गेले होते. ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली. परंतु, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे शुक्रवारी ( दि. २२एप्रिल) ला शेगाव पोलिस ठाण्यात भाऊ नितीन चौधरी तक्रार दाखल केली. सदर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरूवात केली.

कुटूंबियांची शोधाशोध सुरू असताना शनिवारी महेशचा भाऊ नितीन याला तो मित्राच्याच मोटारसायकलने वरोरा येथे गेल्याची माहिती मिळाली होती. याच दरम्यान मेसा मार्गावरील जंगलात एक मोटरसायकल पाहिले असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी नितीनला सांगितले. यानंतर त्याने मेसाच्या जंगलात जावून पाहाणी केली असता चप्पल, रक्ताचा सळा, रक्ताने माखलेली स्टील रॉड तसेच एका झुडपाआड रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

ठाणेदार अविनाश मेश्राम आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर आढळून आलेला मृतदेहावरून त्याची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. त्यानंतर महेश हा शेगाव (बुज.) येथून स्वप्नील चौधरी व एका विधी संघर्ष बालकासह घरातून वरोरा येथे जाण्यासाठी मोटरसायकलने गेला होता. परंतु तो तेथे पोहोचला नसल्याचे उघडकिस आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी काल शनिवारी स्वप्नील चौधरी आणि एका विधी संघर्ष बालकास संशयीत म्हणून ताब्यात घेतले. त्यांनतर केलेल्या तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली.

महेश घोडमारे व स्वप्नील चौधरी हे दोघे मित्र होते. एकमेकांना आर्थिक मदत करीत होते. महिनाभरापूर्वी महेशने ३ हजार रूपये हातउसने घेतले होते. परंतु, परत करण्यास काही कारणाने विलंब झाला होता. त्यामुळे दोघांमध्ये पैशाच्या कारणावरून कडाक्याने भांडण झाले होते. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने दोन दिवसापूर्वी वरोरा येथे जाण्याच्या बहाण्याने महेशला घेऊन गेला होता. सोबत विधी संघर्ष बालक मित्रही होता. मेसा मार्गावरील जंगलात त्याला नेऊन दगड आणि स्टिल रॉडने जबर मारहाण करून त्याची हत्या केली. त्यानंतर स्वप्नील चौधरी घरी परतला होता. यानंतर संशयीत म्हणून ताब्यात घेतलेल्या आरोपीने हातउसने पैशाच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी हत्या केल्याची कबुली दिली. अथक प्रयत्नानंतर महेश घोडमारेच्या हत्येचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले.

हेही वाचलंत का? 

Back to top button