चंदगड : अडकूर परिसरात हत्तीचे आगमन; ग्रामस्थांमध्‍ये भीतीचे वातावरण | पुढारी

चंदगड : अडकूर परिसरात हत्तीचे आगमन; ग्रामस्थांमध्‍ये भीतीचे वातावरण

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : जंगलाने व्यापलेल्या चंदगड तालुक्यात सिंधुदुर्ग व कर्नाटक सीमेवर हत्तीचे वारंवार आगमन होत आहे. अनेकदा या हत्तींकडून प्रचंड मोठे नुकसानदेखील केले जात आहे. शुक्रवारी गजबजलेल्या अडकुर, गणुचीवाडी, आमरोळी, केंचेवाडी परिसरात हत्तीचे आगमन झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

अडकूर परिसरातील गणुचीवाडी गावामध्ये श्री. कोट यांच्या शेतात शुक्रवारी (दि. २५) सकाळी आठ वाजता एक हत्ती घटप्रभा नदीच्या दिशेने जाताना दिसला. उसाची नुकतीच लागवड केलेल्या या शेतात अगदी हाकेच्या अंतरावरील हत्ती जात असल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हा हत्ती अडकूर बंधाऱ्यालगत असणाऱ्या घटप्रभा नदीत हत्ती पोहतानाचा व्हिडीओ प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला.

यानंतर हा हत्ती  घटप्रभा नदी ओलांडून पलीकडे गेला. शेतात हत्तीच्या पायांचे ठसे दिसून आले. अचानक आलेल्या या हत्तीमुळे शेतकऱ्यांची भांबेरी उडाली. अनेकांनी परिसरातील शेतकऱ्यांना सावध केले. सध्या हत्ती अमारोळी क्रशर मशिन येथून केंचेवाडीच्या दिशेने निघून अडकुरच्या दिशेने परतल्याची चर्चा आहे.

हत्ती आल्याचे कळताच अडकुरसह परिसरात एकच गर्दी झाली होती. या घटनेने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र उसाची लागवड केलेली असून या हत्तीकडून उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. घटनास्थळी
वन  विभाग व पोलीस खात्याचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

Back to top button