निपाणी; पुढारी वृत्तसेवा : निपाणी शहर उपनगर व परिसरात गेल्या तीन महिन्यापासून घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचे घर फोडून रक्कम व ऐवज लांबवला. याशिवाय अन्य दोन ठिकाणी घरफोडी झाली असून यामध्ये माजी सैनिकाच्या घराचाही समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात निपाणी शहर व उपनगरात 40 घरफोड्या झाल्या आहेत. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर पोलिस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून वेळीच चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी हाेत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर पहिली गल्लीतील चव्हाण अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी दोन बंद घरे फोडली. चांदी व रोकड असा एकूण २० हजाराचा ऐवज लांबविला. त्यामुळे परिसरातील नागरिकात घबराट पसरली आहे. जवान विक्रम सदाशिव चव्हाण व निवृत्त सहाय्यक फौजदार एम. एस. हांजी यांच्या घरात चोरी झाली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, विक्रम चव्हाण हे सैनिक आहेत. त्यांच्या घरची मंडळी बाहेरगावी गेली होती. माजी सहाय्यक फौजदार एम. एस. हंजी हे देखील बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील दोन घरे फोडली. एम. एस. हंजी यांच्या घरातील दोन पैंजणजोड व ६ हजाराची रकम तर विक्रम चव्हाण यांच्या घरातील 1600 रुपयांसह एकूण २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, मात्र या घटनांची अद्यापही पोलिसांत नोंद झाली नसल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांनी दिली.
निपाणी शहर व उपनगराची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सद्यस्थितीचा विचार करता दिवसाआड घरफोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. अर्थात पोलिसांचीही गस्त सुरू आहे, मात्र चोरट्यांचे नेमके ठिकाण पोलिसांना सापडून येत नसल्याने चोरट्यांचे फावले आहे. आतापर्यंत चार ते पाच उपनगरांमध्ये दिसून आलेल्या चोरट्यांचा पोलिसांनी पाठलाग केला मात्र, चोरट्यांनी प्रत्येकवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. गुरुवारी मध्यरात्री प्रगतीनगरमध्ये असाच प्रकार घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर पोलिस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी हाेत आहे.