Inspiring viral video : एका स्‍वप्‍नपूर्तीसाठी ‘तो’ मध्‍यरात्री धावताेय १० किलोमीटर ! | पुढारी

Inspiring viral video : एका स्‍वप्‍नपूर्तीसाठी 'तो' मध्‍यरात्री धावताेय १० किलोमीटर !

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तो अवघा १९ वर्षांचा आहे.  मध्‍यरात्री धावतानाचा त्‍याचा एक व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्‍हायरल ( Inspiring viral video ) झाला. आणि यानंतर अवघ्‍या काही तासांमध्‍ये या युवकाची जिद्‍द आणि प्रेरणादायी प्रवासाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. नोकरीचे तास संपल्‍यानंतर हा युवक दररोज मध्‍यरात्री तब्‍बल १० किलोमीटर धावत आपल्‍या घरी जातो. एका स्‍वप्‍नपूर्तीसाठी मागील काही महिने त्‍याचा हा प्रवास सुरु आहे. प्रदीपचा रोजच्‍या जगण्‍यातील संघर्ष हा सर्व सुविधा असूनही नेहमीच अडचणीचा पाठा वाचणार्‍या तरुणाईसाठी आदर्श असाच आहे.

नोएडा येथील १९ वर्षीय प्रदीप मेहरा हा मॅकडोनाल्‍ड कंपनीच्‍या स्‍टोअरमध्‍ये नोकरी करतो. मध्‍यरात्री तो धावत होता. यावेळी रस्‍त्‍यावरुन चित्रपट निर्माता विनोद कापडी आपल्‍या कारने जात होते. हा युवक मध्‍यरात्री का धावत असेल ? याची उत्‍सुकता त्‍यांनी लागली. त्‍यांनी याचा व्‍हिडीओ शूट केला. तसेच प्रदीपला पहाटे का धावत नाहीस, असा प्रश्‍नही  विचारला. यावर प्रदीपने त्‍यांची व कुटुंबीयांची माहिती दिली.

Inspiring viral video : भारतीय सैन्‍यदलात भरती होण्‍याचे स्‍वप्‍न

विनोद कापडी यांच्‍याशी बोलताना प्रदीपने सांगितले की, ” तो मुळचा उत्तराखंड राज्‍यातील आहे. तो मोठ्या भावाबरोबर नोएडा येथे आला. त्‍यांच्‍या आई आजारी असून ती हॉस्‍पिटलमध्‍ये ॲडमिट आहे. कुटुंबाची जबाबदारी या दोघा भावांवर आहे. तो नोएडा येथे मॅकडोनाल्‍ड कंपनीच्‍या स्‍टोअरमध्‍ये नोकरी करतो. दोघे भाऊ सकाळी आठपर्यंत जेवण तयार करतात. यानंतर तो सकाळी एका ठिकाणी नोकरीला जातो. भारतीय सैन्‍यदलात भरती होण्‍याचे प्रदीप याचे स्‍वप्‍न आहे. यासाठीच्‍या शारीरिक चाचणीसाठी घरातील परिस्‍थितीमुळे सकाळी आणि सायंकाळीही नोकरी करावी लागते; मग उरते  मध्‍यरात्रीची वेळ. तो दररोज मध्‍यरात्री १० किलोमीटर धावत नोएडा सेक्‍टर १६ मधील आपल्‍या घरी येतो.

‘मला कोण ओळखणार ? मी चुकीचे काहीच करत नाही’

विनोद कापडी यांनी प्रदीप धावत असताचा व्‍हिडीओ शूट केला. त्‍याला सांगितले की, हा व्‍हिडीओ व्‍हायरल होणार आहे. यावर प्रदीपने अत्‍यंत विनम्रपणे म्‍हणाला की, “व्‍हिडीओ व्‍हायरल होवू देत. मला कोण ओळखणार आहे. तसेच मी चुकीचे काहीच करत नाही. त्‍यामुळे व्‍हिडीओ व्‍हायरल झाला तरी काहीच होणार नाही.” यावेळी कापडी यांनी त्‍याला जेवणाचे निमंत्रण दिले. तसेच कारने लिप्‍ट देण्‍याचेही तयारी दर्शवली. यावर प्रदीप म्‍हणाला, ” मी तुमच्‍याबरोबर जेवलो तर माझा भाऊ उपाशी राहिल. तो एका कंपनीत रात्रपाळीत काम करतो. मी जेवण करुन आलो आहे असे समजलं तर तो एकट्यासाठी जेवण तयार करणार नाही. तसेच मी तुमच्‍या कारमध्‍ये बसलो तर आजचा माझा धावण्‍याचा सरावही वाया जाईल.” प्रदीपच्‍या या उत्तराने कापडी यांनी त्‍यांच्‍या जिद्‍दीला आणि बंधुप्रेमाला सलाम केला. प्रदीपने आपल्‍या लक्ष्‍यपूर्तीसाठीची धाव कायम ठेवली तर विनोद कापडी यांनी प्रदीपच्‍या प्रेरणादायी प्रवासाचा व्‍हिडीओ व्‍हायरल केला. या व्‍हिडीओला नेटकर्‍यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button