‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नाशिकमध्ये, विकासक, व्यापारी, उद्योजकांशी चर्चा

file photo
file photo

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महायुतीच्या समन्वय बैठकीनंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवाराविषयीची नाराजी कायम असून, महायुतीचे नेते प्रचारात सक्रिय होत नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'डॅमेज कंट्रोल'साठी पुन्हा एकदा रविवारी (दि. १२) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसह ते शहरातील विकासक, व्यापारी आणि उद्योजकांशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी आता जेमतेम आठवडाभराचाच कालावधी शिल्लक असून, प्रचारासाठी अवघे सहा दिवसच उरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्यासाठी नाशिकची जागा प्रतिष्ठेची केली होती. मोठ्या संघर्षांनंतर गोडसे यांना नाशिकची उमेदवारी मिळाली असली तरी महायुतीतील नाराजीनाट्य मात्र अद्यापही कायम राहिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतरही सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी गोडसेंच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविलेला नाही. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ बुधवारी (दि.८) मुख्यमंत्री शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यावेळी जिल्ह्यात असूनही अनुपस्थित राहिले. ही बाब मुख्यमंत्री शिंदे यांना खटकली नसेल तर नवलच. महायुतीच्या समन्वय बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले होते. परंतु अद्यापही बरेच नेते प्रचारात सक्रिय सहभाग घेत नसल्याचे किंवा शरिराने उपस्थित असले तरी त्यांच्याकडून मनाची साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच शहरातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि विकासकही गेल्या १० वर्षांतील कामगिरीवर फारसे खूश नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंना नाशिकचा गड सावरण्यासाठी पुन्हा एकदा नाशिकचा दौरा करण्याची वेळ आली आहे. रविवारी (दि.१२) सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे नाशिकमध्ये आगमन होणार असून, गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे महायुतीच्या नेत्यांसह विविध मान्यवरांच्या ते भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर रात्री ८ वाजता एका खासगी हॉटेलमध्ये शहरातील उद्योजकांशी त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री गोडसेंविरोधातील नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news