शोध सुखाचा : ‘स्वसंवाद’ म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर | पुढारी

शोध सुखाचा : 'स्वसंवाद' म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर

सुजाता पेंडसे

सेल्फ टॉक किंवा स्वसंवाद म्हणूया, ही अशी सवय आहे, जी प्रत्येक माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग असते. दिवसभर माणूस कामानिमित्त किंवा अवांतर असा संवाद दुसर्‍या कुणाशी ना कुणाशी करतच असतो. जेव्हा तो बाहेर कुणाशी बोलत नसतो, तेव्हा स्वत:शी त्याचा संवाद सुरू असतो. सेल्फ टॉक ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कारण ती मनोमन सुरू असते. ती बाहेर कुणाला दिसत नाही, ऐकू येत नाही, पण अखंड सुरू असते.

तुम्हीदेखील सेल्फ टॉकवर फक्त एक दिवस लक्ष द्या. नीट हा संवाद ऐका. तुम्हाला स्वत:ला आश्चर्य वाटेल, असे काही विचार मनात घुटमळत असतात. विचारांशिवाय मन राहूच शकत नाही. ती एक सहजक्रिया आहे. परंतु हीच गोष्ट आपल्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख असते. तुम्ही बाहेरच्या जगात काय करता, कसे वावरता यापेक्षा तुम्ही आतमध्ये स्वत:शी, स्वत:बद्दल, बाहेरच्या जगातल्या घाडामोडींबद्दल काय विचार करता, या दोन्ही गोष्टीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या तुमचे वर्तमान आणि भविष्य दोन्हीही घडवू किंवा बिघडवू शकतात. ते कसे ते आपण पाहूया.

तुम्ही सकाळी झोपेतून जागे होता, तेव्हा लगेचच दिवसभर पुढे काय काय करायचे आहे, याबद्दल विचार करू लागता. आज परीक्षा आहे. अजून अभ्यास बराच बाकी आहे, असा विचार एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात आला, तर तो ताबडतोब अंथरुणातून उठतो. भराभर आवरून अभ्यासाला बसतो. हातात पुस्तक घेईपर्यंत त्याच्या मनात असंख्य विचार येऊन गेलेले असतात. मग ते वडिलांबद्दल असू शकतात, आई अभ्यासाबद्दल रागावते ते आठवतं किंवा आपल्या वर्गातल्या हुशार मुलाची आठवण काढताना ‘त्यालाच कसे काय इतके मार्क्स पडतात’ किंवा ‘शिक्षकही त्याचेच जास्त कौतुक करतात. मला कधीच कौतुक मिळत नाही’, असंही वाटून जातं. हातात पुस्तक घेतल्यावर मग ‘बापरे! केवढा अभ्यास बाकी आहे. माझ्या डोक्यात काही शिरतच नाही. कशाला ही एवढी मोठी पुस्तकं बनवली असतील? सारखा अभ्यास, क्लास, परीक्षा, वैताग आहे नुसता!’ अशा प्रकारचे अनंत विचार सुरू झालेले असतात.

याच ठिकाणी एखादी गृहिणी असेल तर तिला सकाळी उठल्यापासून पुढची कामं दिसत असतात. मुलं शाळेत जात असतील तर ‘डब्याला काय करायचं, याला हे आवडत नाही. त्याला ते नाही. नेमकं काय करू? नवर्‍याच्या हातात सगळ्या गोष्टी नेऊन देताना एक गोष्ट स्वत:हून घ्यायला नको. नुसतं बसून ऑर्डर सोडतात. दिवसभर इतकं सगळं उरलं पुरलं बघायचं, आणि वर हे लोक काय म्हणणार, तुला काय काम असतं? सुखच नाही बाई आम्हाला!’ असे विचार करू शकते.

एखादा पुरुष दिवसभरच्या कामांची यादी आठवताना आधीच दमून जातो. घराच्या हप्त्यांचा विचार, मुलांच्या शाळेची फी वगैरे, घरखर्च भागवायचा विचार करताना ‘किती मिळवा, किती धावाधाव करा. पैसे पुरतच नाहीत. तो अमुक माणूस बघा, घर बांधलं, नवी गाडी घेतली. कसा ऐटीत जातो गाडीतून. नाहीतर आम्ही… काही परवडतच नाही. जेमतेम संसार चालतो!’

वर दिलेल्या तीनही उदाहरणातल्या व्यक्ती या ‘सेल्फ टॉक’मध्ये काय काय बोलल्या आहेत ते बघा. त्यांच्या किती वाक्यांमध्ये ‘नाही’ हा शब्द आलाय, तसंच त्या प्रत्येक बोलल्या गेलेल्या वाक्यात किती इन्व्हॉलमेंट आहे, यावर तुमच्या मनाने काय काय पटवून घेतलंय, मान्य केलंय त्याचं स्पष्ट चित्र दिसतं. मनातला वैताग, असमाधान दिसतं. हे उदाहरण अगदीच मामुली आहे, इतकं काय मनात सुरू असतं. तुम्ही कृती करता एक आणि मनात विचार अगदी विरोधी असंही सुरू असतं. उदा. एखादी व्यक्ती घरी आली, ती तुम्हाला विशेष आवडत नाही. तरीही तुम्ही तोंडभरून स्वागत करता. अरे वा! किती दिेवसांनी आलात. खूप छान वाटलं. आता जेवूनच जा! इथपर्यंत आदरातिथ्याचा दिखावा केला जातो. तुम्ही म्हणाल, जगात तसं वागावंच लागतं. मुखवटा तर प्रत्येकाचाच असतो. ‘खरा चेहरा’ दिसू लागला, तर माणसांचं एकमेकांशी कधी पटणार नाही! हेही ठीक आहे. की ‘जसे आत.. तसे बाहेर’ हे तुम्ही पूर्णपणे समंजस, विचारी झाल्याशिवाय दाखवणे योग्य नाही. पण तुम्हाला स्वत:ला तुमचा ‘खरा चेहरा’ जाणून घेणं खूप गरजेचं आहे/ त्यासाठी ‘सेल्फ टॉक’वर नजर ठेवा.

‘सेल्फ टॉक’ म्हणजे आपल्या मनातले, तुम्ही पकडून ठेवलेले विश्वास किंवा श्रद्धा असतात, ज्या एक तर तुमच्या सततचे ‘थॉट पॅटर्न’ आणि अनुभव यातून बनलेल्या असतात. लहानपणापासून आजपर्यंत जे ऐकलंय, अनुभवलंय, शिकवलंय, त्याचा परिपाक असतो. सुप्त मनात काय काय गेलंय त्याचं आजचं शब्दरूप म्हणजे ‘सेल्फ टॉक’. त्यावर काम केलं तर सुप्त मनात रुजलेल्या जुन्या धारणा, गैरसमजुती बदलता येतात. त्यासाठी नेमकं काय करायचं? तर तुम्हीच तुमच्या सेल्फ टॉकचा अभ्यास करा. त्यात कोणते शब्द नकारात्मक आहेत, त्या जागी नवे होकारात्मक शब्द घाला. अशा वाक्यांची पुनर्रचना करा आणि त्याची सतत उजळणी करा. कारण जुनी गडद रेघ पुसायची असेल तर न कंटाळता प्रयत्न करावेच लागतात.

आता काही वाक्ये बघा…

‘मी हे करू शकत नाही!’ऐवजी ‘मी प्रयत्न करेन’ असे म्हणा. ‘मी नेहमी चुका करतो. मूर्ख आहे मी!’ऐवजी ‘मी खूपदा उत्तम काम केले आहे. मी थोडे अधिक लक्ष देईन!’ असे म्हणा. ‘तुमच्यासारखी खरेदी आम्हाला शक्यच नाही!’ असे म्हणण्याऐवजी ‘मीही लवकरच मनासारखं सगळं घेईन!’ असे म्हणा. ‘माझा भाऊ, बहीण, सहकारी माझ्याहून खूप हुशार आहेत. मी काहीच नाही’, असे म्हणण्याऐवजी ‘प्रत्येकाचे स्ट्राँग पॉईंटस् वेगवेगळे असतात. मला खूप काही वेगळं सहज करता येतं!’ हे म्हणा. ‘मला गणित, सायन्स हे विषय अवघड जातात. मी नापास होईन बहुतेक’ याऐवजी ‘मी अमुक विषयात स्ट्राँग आहे आणि गणित, सायन्स हे मी चॅलेंज म्हणून स्वीकारलंय’, असे म्हणा.

ही उदाहरणे अगदी छोटी असली तरी प्रातिनिधिक आहेत. तुमच्या सेल्फ टॉकमधील सर्वच्या सर्व नकारात्मक वाक्यांना, शब्दांना बदलून टाका. कारण प्रत्येक घडलेल्या घटनेत तुमचा स्वत:चा दोष गृहीत धरणे म्हणजे एकांगी विचार करणे आहे. त्यापेक्षा स्वत:वर आपण आहोत तसे प्रेम करणे गरजेचे आहे. अर्थात हे प्रेम अहंकार व्हावा इतके असू नये. मात्र आहे त्याहून आपण अधिक चांगले बनण्यासाठी प्रेम गरजेचे आहे. ‘मला काहीच येत नाही’, ‘ मी कुणालाच आवडत नाही’, ‘मला हे शक्यच नाही!’ अशा प्रकारची वाक्ये मनात चुकूनही उच्चारू नका. त्याऐवजी ‘मी मला आवडतो’, ‘मी शिकायला तयार आहे’ अशी छोटी छोटी ‘मी’ असणारी वाक्ये ‘सेल्फ टॉक’मध्ये सामावून टाका. तसे केले नाही तर अशा पद्धतीच्या विचारांचा ‘थॉट पॅटर्न’ सुप्त मनात पोचतो आणि तशाच परिणामांना आकर्षित करतो. सेल्फ टॉक योग्य आणि अर्थपूर्ण असेल तर हळूहळू परिस्थिती बदलत जाईल, आणि एक दिवस तुम्हाला ‘हवे तसे’ तुम्ही असाल.

Back to top button