राज ठाकरे महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत – संजय राऊत यांची खोचक टीका

राज ठाकरे महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत – संजय राऊत यांची खोचक टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. मोदी, अमित शाह यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ते महाराष्ट्राचे, मराठी माणसांचे शत्रू आहेत, असे सांगणारे हे सद‌्गृहस्थ आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसताहेत याबद्दल ईडीचे आभार असा टोलाही राऊत यांनी लगावला.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. मशिदीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचे फतवे काढले जाणार असतील, तर मी हिंदूंना फतवा काढतो की, त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मते द्यावी, असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर खा. राऊत यांनी जळजळीत टीका केली. ते म्हणाले, काढा फतवा काढा. ते आता फतव्यांकडे वळले आहेत. काही नेते आणि पक्षांची दखल महाराष्ट्राने घ्यावी, अशी त्यांची स्थिती राहिलेली नाही. महाराष्ट्रासह देशात संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेले असताना, या देशातील सर्व जाती, धर्माचे लोक संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत. मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत. त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. ठाकरे परिवाराने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्याच कुटुंबातील एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी चाल करून येणाऱ्या व्यक्तींना मदत करून इच्छित असेल, तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पवित्र आत्मा स्वस्थ बसणार नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली. मोदींनी महाराष्ट्रात कितीही सभा घेतल्या, तरी आता महाराष्ट्र आणि देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. मोदींची शारीरिक व मानसिक स्थिती बरी नाही. त्यांनी घरी बसावे अन्यथा लोकच त्यांना घरी बसवतील, असा दावाही त्यांनी केला.

मविआच्या सभेला केजरीवाल उपस्थित राहणार
आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरीम जामीन मंजूर झाला आहे. याबाबत राऊत म्हणाले की, येत्या १७ मे रोजी मुंबईत मविआच्या प्रचाराची सांगता सभा होत आहे. त्या सभेसाठी केजरीवाल यांना निमंत्रित केले आहे. त्यांनी आमंत्रण स्वीकारले आहे. या दिवशी नरेंद्र मोदी हेदेखील मुंबईत आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर केजरीवाल उपस्थित असतील, असे राऊत यांनी सांगितले.

भूसंपादन घोटाळ्याची मंगळवारी पोलखोल
नाशिक महापालिकेत राज्याच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून ८०० ते ९०० कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला आहे. मंगळवारी (दि. १४) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची पोलखोल करणार असून, बुधवारी (दि. १५) नाशिकमध्ये येऊन माध्यमांसमोर कागदोपत्री पुरावे सादर करणार असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास खात्याचे कामकाज सुरू आहे. नगरविकास खात्याने जनतेचा पैसा कसा लुटला, ठराविक बिल्डरांची कशी चांदी केली, हे पुराव्यासह सांगणार असल्याचेही राऊत म्हणाले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news