युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनला कर्नाटकातील त्याच्या मूळ गावी दिला अखेरचा निरोप | पुढारी

युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनला कर्नाटकातील त्याच्या मूळ गावी दिला अखेरचा निरोप

बंगळूर; पुढारी ऑनलाईन

युक्रेनमध्ये बॉम्बहल्ल्यात ठार झालेला वैद्यकीय विद्यार्थी नवीन ग्यानगौडर याचे पार्थिव आज सोमवारी (दि. २१) पहाटे बंगळुरात आणण्यात आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याला विमानतळावर श्रद्धांजली वाहून अखेरचा निरोप दिला. यावेळी ग्यानगौडर कुटुंबीय उपस्थित होते. नवीन हा खार्किव्ह नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीयच्या अंतिम वर्षात शिकत होता. रशिया-युक्रेन संघर्षात १ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.

त्याचे पार्थिव हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर तालुक्यातील चळगेरी या त्याच्या मूळ गावी नेण्यात आले. तेथे त्याला शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. हावेरी जिल्ह्यातील चळगेरी येथील विद्यार्थी नवीन हा युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत होता. रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात तो ठार झाला. या घटनेला दोन आठवडे उलटले आहेत. त्याचे पार्थिव आणण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात होते. या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

बॉम्ब हल्ल्यात ठार झाल्यानंतर नवीनचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला होता. त्यानंतर त्याची ओळख पटवण्यात आली. मृतदेह युक्रेनमधील शवागारात ठेवण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून पार्थिव बंगळुरात आणण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button