जालना : विहिरीवर पोहण्याच्या वादातून खून; अंबड पोलिसात पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

जालना : विहिरीवर पोहण्याच्या वादातून खून; अंबड पोलिसात पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जालना पुढारी वृत्तसेवा : विहिरीवर पोहण्याच्या ठिकाणी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरुन तरूणावर हल्ला करण्यात आला. एका २० वर्षीय मुलास लोखंडी रॉड व लाकडी दांडयाने दि. १२ रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी पठाण मोहल्ला अंबड येथे जमाव जमवून जबर मारहाण करण्यात आली.

दरम्यान, जालना येथील एका खासगी रुग्णालयात दि. १३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रामेश्वर अंकुश खरात (वय २० वर्ष, रा. होळकरनगर अंबड) यांची प्राणज्योत मावळली. घटनेच्या निषेधार्थ रात्री १२ वाजेपर्यंत अंबड पोलीस ठाण्यात आरोपीस अटक करण्यासाठी जमावाने ठाण मांडले होते.

संबंधित प्रकरणाची दिनांक १३ रोजी अंबड पोलिसात रात्री उशिरा फिर्याद दाखल करण्यात आली. दि. १२ रोजी मयत रामेश्वर अंकुश खरात हा दुपारी एक वाजताच्या सुमारास स्वंयभू महादेव मंदीर रस्त्यावरील फुलारे यांच्या विहिरीवर पोहण्यासाठी प्रसाद प्रल्हाद खरात यांच्यासोबत गेला होता. यावेळी तेथील तरूणांमध्ये विहिरीत पोहण्याच्या कारणावरून वाद झाला. मोहल्यात दिसला, तर तुला जिवे ठार मारु अशी धमकी देऊन शिविगाळ झाल्याच्या वादाची माहिती चुलत भाऊ गणेश खरात यास फोन लावून रामेश्वर याने दिली.

रामेश्वर खरात हा दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास होळकर नगर येथुन पठाण मोहल्यामार्गे शेतात जात असताना खलील मौलाना यांच्या दुकानासमोर रामेश्वर खरात यास जमावाकडून अडविण्यात आले. विहिरीवर पोहायच्या वेळेस आमच्या सोबत भांडण का केलेस, असे म्हणुन त्यास शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान शोहेब सुलानी, शफीक सुलानी यांनी त्यांच्या हातातील लोखंडी गजाने मारल्यामुळे रामेश्वर हा गंभीर जखमी झाला.

आवेज सिराज शेख, शोहेल शह मोहम्मद पठाण, अनिस गफ्फार शेख, वाजेद इस्माईल शेख, अमीर चांद पठान यांनी रामेश्वर यास लाकडी दांडयाने हातावर पायावर, पाठीवर तसेच डोक्यात मारुन जखमी केले. गुन्ह्यातील इतर आरोपींनी त्यास लाथाबुक्यानी मारहाण करुन गंभीर जखमी केले.

दरम्यान, रामेश्वर खरात हा गंभीर जखमी होवुन बेशुध्द पडल्याने त्यास सुनिल दिवटे व बाळु दत्ता खरात यांनी मोटरसायकलवर बसुन अंबड येथील सेवा हॉस्पिटल येथे उपचारसाठी दाखल केले. परंतु रामेश्वर खरात गंभीर जखमी असल्याने जालना येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि.१३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अंबड पोलिसात मयताचे चुलते बाबुराव दगडु खरात यांच्या फिर्यादीवरून वरील १५ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके हे करत आहेत.

संबंधीत प्रकरणातील संशयित आरोपींची नावे

१) इब्राहीम सिराज शेख २) अदनान सुलानी शफीक सुलानी, ३) शोहेब सुलानी शफीक सुलानी, ४) अजहर इजाज अली शेख , ५) फैजान अमजद पठाण , ६) अरबाज शाह महम्मद पठाण , ७ ) मुरादी मेहरा शेख, ८) आवेज सिराज शेख , ९) शोहेल शाहमोहम्मद पठाण , १०) अनिस गप्फार शेख , ११ ) वाजेद इस्माईल शेख , १२) अमीर चांद पठान , १३) अभय बाबासाहेब खरात , १४) अर्शद खुर्शीद जिलानी, १५) शेख नासेर शेख इस्माईल हे सर्व अंबड येथील रहिवासी आहेत.

खून झाल्याची माहिती परिसरात पसरताच अंबड पोलीस ठाण्यात शेकडो लोकांचा जमावाने एकञ येऊन तीव्र निषेध केला. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे यांनी जमावाला समजावून सांगून आरोपीना ताबडतोब अटक करण्यात येईल, असे आश्वासन जमावामध्ये शांतता निर्माण केली.

मयत रामेश्वर अंकुश खरात यांच्या खुनाच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, व्यापारी महासंघ तसेच धनगर समाजाच्या वतीने आज दि.१४ मार्च रोजी अंबड शहरातील संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवण्यांत आली. यावेळी अंबड मध्ये शांततेत फेरी काढून आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा

Back to top button