आता चक्‍क पिकाखाली ‘सेन्सर’ | पुढारी

आता चक्‍क पिकाखाली ‘सेन्सर’

पुणे : आशिष देशमुख
भारतातील शेतकरी पिकाला देत असलेल्या परंपरागत पाणी पद्धतीत काही दिवसांत बदल झाला, तर आश्‍चर्य वाटायला नको. आता पिकाखाली सेन्सर बसविण्याचे तंत्रज्ञान शोधले गेले आहे. त्यामुळे पिकाला पाण्याची गरज लागली की ते शेतकर्‍याला समजेल. त्यानुसार पाणी देण्याचे नियोजन बांधावर न जाता, कधीही अन् कुठूनही करता येणार आहे.

पुण्यातील स्टार्टअपचे संशोधन; केंद्राचे 1 कोटी, संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या उद्योग संघटनेकडून 33 लाख

पुण्यातील एका छोट्या स्टार्टअपने हे संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांना केंद्र सरकारने 1 कोटी, तर संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या युनिडो या उद्योग संघटनेने 33 लाखांची आर्थिक मदत दिली आहे. कोंढवा भागातील लुल्‍लानगरच्या एका अपार्टमेंटमध्ये दहा बाय दहा आकाराच्या दोन खोल्यांत याचा शोध लागला आहे. जसवीर सिंग आणि फय्याज खान आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक डॉ. अभय हाके यांनी ‘सेन्स इट आऊट’ नावाने 2017 मध्ये हे स्टार्टअप सुरू केले.

असे केले संशोधन…

जसवीरचे वडील तारासिंग जेथ्रा संरक्षण दलाच्या संशोधन विकास संस्थेत (डीआरडीओ) संचालक होते.
जसवीरने शेतकर्‍यांच्या पाणी समस्येचा अभ्यास सुरू केला. पिकाला पाणी देण्याची पद्धत अभ्यासू लागला. शेतकरी आता ड्रीप व स्प्रिंकलर पद्धतीने पूर्वीपेक्षाही 40 टक्के पाणी जास्त देतो. पिकाला ते पाणी पुरेसे आहे की नाही, हे शेतकर्‍याला कळत नाही, असे त्याच्या लक्षात आले. पिकाखाली सेन्सर लावलेकी कळते त्याची तहान जसवीरने अभ्यासाअंती स्वयंचलित सेन्सर तयार करून ते पिकाखाली गाडले. त्याला सोलरच्या सहाय्याने वीज दिली व त्याचे मोबाईल अ‍ॅप तयार केले. त्यामुळे असे लक्षात आले की, जमिनीचा वरचा थर ओला असला तरी कधी मधला, तर कधी तिसरा (खालचा) थर कोरडा असतो. त्यामुळे पीक हिरवेगार दिसत असले, तरीही मुळांना पाण्याची गरज असते. या अभ्यासावर जसवीर व डॉ. हाके यांनी शेतकर्‍यांना सेन्सिंग तंत्रज्ञानाने पाणी देणारे यंत्र तयार करण्याचे काम 2017 साली सुरू केले. 2018 मध्ये त्यांच्या टीममध्ये फय्याज दाखल होताच अधिक वेगाने काम पुढे गेले. अखेर 2021 मध्ये त्यांनी ‘सिक्‍का’ नावाने यंत्र तयार केले.

मोबाईल अ‍ॅपद्वारे द्या शेताला पाणी

रिमोट सेंन्सिंगचे हे तंत्रज्ञान अमेरिकेत आहे. पण पिकाखाली लावण्यासाठी लागणार्‍या सेन्सरची किंमतच दोन ते तीन लाख रुपये आहे. भारतीय शेतकरी गरीब असल्याने आपल्याला खूप स्वस्तात हे मशिन तयार करावे लागेल, हा ध्यास घेत त्यांनी ‘सिक्‍का’ नावाचे किट तयार केले. ते मोबाईल अ‍ॅपशी जोडले. त्यामुळे शेतकरी शेतापासून कितीही लांब असला, तरी क्षणार्धात तो शेताला पाणी देऊ शकतो. दर दोन मिनिटांनी शेतकर्‍याला त्याच्या मोबाईलवर पाण्याची पातळी कळते.

विदेशात हे तंत्रज्ञान आहे. मात्र, एका सेन्सरची किंमत 2 ते 3 लाख रुपये आहे. आम्ही भारतीय तंत्रज्ञान वापरून खूप स्वस्तात तयार केले आहे. आगामी काळात ते मोबाईलच्या किमतीत उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
– जसवीर सिंग, सीईओ, सेन्स इट आऊट, पुणे

Back to top button