IPL Auction 2022 : आयपीएल लिलावात ५५१ कोटींचा खुर्दा ! २०४ खेळाडू मालामाल | पुढारी

IPL Auction 2022 : आयपीएल लिलावात ५५१ कोटींचा खुर्दा ! २०४ खेळाडू मालामाल

बंगळूर (वृत्तसंस्था) : इंडियन प्रीमिअर लीगसाठी बंगळूर येेथे रंगलेल्या महालिलावात ( IPL Auction 2022 ) दहा फ्रेंचाईजींनी मिळून 204 खेळाडूंवर सुमारे 551.70 कोटी रुपयांची उधळण केली. यापैकी 67 खेळाडू परदेशी आहेत. इशान किशन हा यंदाच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने त्याला 15.25 कोटी रुपयांना शनिवारी खरेदी केले होते.

रविवारी दुसर्‍या दिवशी झालेल्‍या लिलावात ( IPL Auction 2022 ) इंग्लंडचा लियम लिविंगस्टोन याला पंजाब किंग्जने सर्वाधिक 11.50 कोटी रुपये मोजले. इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आता मुंबई इंडियन्समधून जसप्रीत बुमराहच्या जोडीने गोलंदाजी करताना दिसेल. 8 कोटींच्या किमतीत मुंबईने त्याला राजस्थानकडून आपल्याकडे घेतले. सिंगापूर या असोसिएटेड देशातील खेळाडू टिम डेव्हिड याला मुंबईने निवडले. यासाठी मुंबईने 8.25 कोटी रुपये खर्च केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. डेव्हिड हा हार्दिक पंड्याचा रिप्लेसमेंट मानला जातो. तुळजापूरचा राजवर्धन हंगर्गेकर याला दीड कोटी रुपयांना धोनीच्या चेन्‍नई सुपर किंग्ज संघाने विकत घेतले. तर अष्टपैलू राज बावा याला दोन कोटी रुपयांना पंजाबने आपल्याकडे खेचले. इशांत शर्मा, सुरेश रैना, इऑन मॉर्गन, अ‍ॅरॉन फिंच, उमेश यादव हे दिग्गज मात्र ‘अनसोल्ड’ राहिले.

IPL Auction 2022 : जोफ्रा आर्चरसाठी मुंबईची चढाओढ

आयपीएलच्या मागील सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात असणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला यंदा मुंबई इंडियन्सने तगडी बोली लावत आपल्या संघात घेतले. आज लिलवात राजस्थानेही जोफ्रा आपल्याच संघात राहण्यासाठी बोली वाढवत नेली. अखेर अंबानींनी बाजी मारत जोफ्रासाठी 8 कोटींची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात घेतले. आता मुंबईच्या ताफ्यात जसप्रित बुमराह बरोबरच जोफ्रा सारखा तगडा वेगवान गोलंदाज असणार आहे.

IPL Auction 2022 :  मुंबईचा तरुणांवर भरवसा

यंदाच्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने आपले 25 शिलेदार निवडलेले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदाच्या आयपीएलमध्ये बहुतांशी युवा खेळाडू उतरणार आहेत. मुंबईचा संघ यावेळी चांगलाच समतोल दिसत आहे. कारण या संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंचा चांगला भरणा पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने यंदाच्या लिलावात इशान किशनवर सर्वाधिक 15.25 कोटी रुपयांची बोली लावली. त्याचबरोबर मुंबईच्या संघाने यावेळी टीम डेव्हिडला 8.25 कोटी रुपये मोजत आपल्या संघात दाखल केले आहे. जोफ्रा आर्चरसाठी तब्बल 8 कोटी रुपये मोजत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या ताफ्यात दाखल केले आहे. आयपीएल लिलावाच्या दुसर्‍या दिवसासाठी मुंबई इंडियन्सकडे 27.85 कोटी रुपये एवढी रक्‍कम होती. पण, मुंबईच्या खात्यात आता फक्‍त 10 लाख रुपये शिल्लक आहेत.

मुंबई इंडियन्सचा संघ असा : रोहित शर्मा (16 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), केरॉन पोलार्ड (6 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), इशान किशन (15.25 कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस (3 कोटी), बासील थम्पी (30 लाख), मुरुगन अश्‍विन (1.60 कोटी), जयदेव उनाडकट (1.30 कोटी), मयंक मार्कंडे (65 लाख) , एन तिलक वर्मा (1.70 कोटी), संजय यादव (50 लाख), जोफ्रा आर्चर (8 कोटी), डॅनिएल सॅम्स (2.60 कोटी), टायमल मिल्स (1.50 कोटी), टीम डेव्हिड (8.25 कोटी), अनमोलप्रीत सिंग (20 लाख), रिले मेरेडिथ (1 कोटी), मोहम्मद अर्शद खान (20 लाख), हृतिक शोकीन (20 लाख), फॅबियन अ‍ॅलन (75 लाख), आर्यन जुयाल ( 20 लाख), अर्जुन तेंडुलकर (30 लाख), रमनदीपसिंग (20 लाख), राहुल बुद्धी (20 लाख).

28 वर्षीय लिविंगस्टोन याच्यासाठी चेन्‍नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरुवातीला चुरस रंगली. त्याची किंमत 4.2 कोटी रुपयांवर पोहोचल्यानंतर लिलावात पंजाब किंग्जने उडी घेतली. त्यानंतर गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांनीही बोली लावली. शेवटी पंजाबने 11.50 कोटींवर ही शर्यत जिंकली.
इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या दि हंड्रेड या टी-20 लीगमध्ये लिविंगस्टोनने आपला जलवा दाखवून दिला होता. 178 च्या सरासरीने त्याने स्पर्धेत 348 धावा केल्यामुळे त्याला स्पर्धावीरचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय त्याने 5 विकेटही घेतल्या होत्या. टी-20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने 22 धावांत 2 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे लिविंगस्टोन भाव खाऊन गेला.
शनिवारी लिलावात फारशी हालचाल न केलेल्या मुंबईने रविवारी दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाची मोठी बोली जिंकली. त्यांनी सिंगापूरच्या टिम डेव्हिड याच्यासाठी 8.25 कोटी रुपये मोजले. डेव्हिडने पाकिस्तान प्रीमिअर लीगमध्ये 29 चेंडूत 71 धावा केल्या होत्या. तेव्हापासून तो चर्चेत आला. टी-20 मध्ये त्याचा स्ट्राईक रेट 159.39 इतका आहे. त्यानंतर मुंबईने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी खिंड लढवली. त्याला 8 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले; पण तो यावर्षी खेळण्याची शक्यता कमी आहे. तरीही पुढील चार सिझनचा विचार करून मुंबईने ही गुंतवणूक केली आहे.

दुसर्‍या दिवशीच्या लिलावात फ्रेंचाईजींनी अष्टपैलू खेळाडूंवर भर दिल्याचे दिसून आले. सनरायजर्स हैदबादने रोमारिओ शेफर्ड याच्यासाठी 7.75 कोटी खर्च केले. याशिवाय मार्को जानसेन याला 4.20 कोटी रुपये बोली लावली. तसेच एडेन मार्करमला 2.60 कोटींचा भाव दिला. पंजाब किंग्जने लिविंगस्टोनशिवाय वेस्ट इंडिजच्या ओडियन स्मिथसाठी 6 कोटी रुपये मोजले. शिवम दुबे याला 4 कोटी रुपयांमध्ये चेन्‍नईने खरेदी केले. अष्टपैलू खेळाडूंइतकेच डावखुर्‍या वेगवान गोलंदाजांनी दुसर्‍या दिवशीही लिलावावर आपली छाप सोडली. खलील अहमदला दिल्‍लीने 5.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. त्यापाठोपाठ चेतन साकरिया (4.20 कोटी) हाही दिल्‍लीकर बनला. यश दयाल (3.20 कोटी) याला गुजरात टायटन्सने आपल्याकडे ओढले. एकेकाळचा सर्वात महागडा भारतीय खेळाडू जयदेव उनाडकट हा 1.30 कोटीमध्ये मुंबईकर झाला.

अंडर-19 वर्ल्डकप गाजविणार्‍या राज बावाची हवा!

अंडर-19 वर्ल्डकप विजेत्या संघातील स्टार अष्टपैलू राज बावाने आयपीएलच्या मेगा लिलावात सर्व फ्रेंचाईजींचे लक्ष वेधून घेतले. 20 लाख बेस प्राईस असलेल्या 19 वर्षीय पोराला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमध्ये चुरस पाहायला मिळाली. सरतेशेवटी पंजाबने बाजी मारत 2 कोटीवर सौदा आपल्या बाजूने केला. याच संघाचा कर्णधार यश धूल याला दिल्‍लीने 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. त्यापाठोपाठ राजवर्धन हंगर्गेकरला चेन्‍नई सुपर किंग्जने 1.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.

गुजरातच्या कृपेने वाढला अर्जुन तेंडुलकरचा पगार

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आयपीएलच्या सुरुवातीपासून मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सचिन निवृत्तीनंतर मैदानावर खेळत नसला तरी मुंबईचा मार्गदर्शक म्हणून नेहमी संघासोबत असतो. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील मुंबई इंडियन्स संघाचा प्रथम नेटमधील गोलंदाज म्हणून होता. गेल्या वर्षी अर्जुन तेंडुलकर प्रथमच लिलावात सहभागी झाला होता. अपेक्षेप्रमाणे मुंबईने त्याला 20 लाख या बेस प्राईसला संघात दाखल करून घेतले.

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाच्या दुसर्‍या दिवशी लिलाव अखेरच्या टप्प्यात आला असताना ह्यू एडमिडस् पुन्हा एकदा लिलाव पुकारण्यासाठी आले. काल रक्‍तदाब कमी झाल्याने ते स्टेजवरून कोसळले होते. त्यानंतर चारू शर्मा यांनी ही जबाबदारी आतापर्यंत सांभाळली होती. लिलाव अखेरच्या टप्प्यात आल्यानंतर चारू शर्मा यांनी एडमिडस् यांच्याकडे सूत्रे दिली. एडमिडस् त्यांनी ज्या खेळाडूंची नावे पुकारली त्याच अर्जुन तेंडुलकरचे नाव होते. अर्जुनचे नाव घेताच मुंबई इंडियन्सने 20 लाख या बेस प्राईसवर बोली लावली. अर्जुनला गेल्या वर्षी अन्य कोणत्या संघांनी बोली लावली नव्हती. या वर्षी देखील असेच होईल, असे वाटले होते, पण प्रत्यक्षात झाले उलटे. गुजरात टायटन्स संघाने अर्जुनवर बोली 25 लाखांची बोली लावत कहानी मे ट्विस्ट आणला. अर्जुनवर लावण्यात आलेल्या या बोलीनंतर मुंबई संघाचे मालक आकाश अंबानी यांना आश्‍चर्य वाटले. त्यांनी पटकन 30 लाखांसाठी अर्जुनला बोली लावली. त्यावर अन्य कोणीही बोली न लावल्याने एडमिडस् तो मुंबई संघात दाखल झाल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर हॉलमध्ये एकच हशा सुरू झाला.

पाहा व्हिडीओ ; All about Cricket | लेग स्पिन बॉलिंग कशी करावी? How to bowl Leg spin?

Back to top button