ओझर : मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून फरशीच्या तुकड्याने तरुणाचा खून | पुढारी

ओझर : मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून फरशीच्या तुकड्याने तरुणाचा खून

ओझर : पुढारी वृत्तसेवा : मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून मनात राग धरून मुलीच्या नातेवाइकांनी एका तरुणाच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून त्याचा खून केल्याची घटना ओझर येथे घडली आहे.

याबाबत मृत राहुल पिठे (23, रा. भगतसिंगनगर, ओझर) यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुलने परिसरात राहणार्‍या मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून मुलीच्या नातेवाइकांनी राग धरला होता. त्यांनी साईधाम रोडवरील यमुनानगर येथील बंद असलेल्या एका मॉलच्या आवारात राहुलच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून त्याला ठार मारले. या प्रकरणी ओझर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी पोलिसांना मार्गदर्शन केले, तर ओझरचे पोलिस निरीक्षक अशोक रहाटे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश मेहुणकर, आर. डी. मोताळे यांचे पथक संशयितांच्या शोधार्थ रवाना केले आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले अधिक तपास करीत आहेत.

आरोपींवर कठोर कारवाई करा
आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे, माजी पं. स. सदस्य नितीन पवार, नितीन नाडे, सचिन शिंगाडे, अंबादास धोंगडे, शंकर लांडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button