नाशिक : उड्डाणपुलावरुन भाजपमध्येच नाराजीचे बार ; गटनेते अरुण पवार यांचा लेटरबॉम्ब | पुढारी

नाशिक : उड्डाणपुलावरुन भाजपमध्येच नाराजीचे बार ; गटनेते अरुण पवार यांचा लेटरबॉम्ब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा :

मायको सर्कल व सिडकोतील त्रिमूर्ती चौक या दोन उड्डाणपुलांच्या प्राकलनात केलेल्या बदलावरून आता सत्ताधारी भाजपमध्येच नाराजीचे बार उडू लागले असून, सभागृहनेते कमलेश बोडके यांच्यानंतर भाजप गटनेते अरुण पवार यांनीदेखील लेटरबॉम्ब टाकत उड्डाणपुलाविषयी महासभेने केलेल्या चुकीच्या ठरावावर आक्षेप नोंदविला आहे. मूळ प्राकलनात बदल करताना, ठरावावर सूचक आणि अनुमोदक यांच्या स्वाक्षर्‍या घेताना, महापौरांनी पक्षाच्या ध्येयधोरणांची पायमल्ली केल्याचा आरोप करीत, याबाबत खुलासा न झाल्यास, पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.

मायको सर्कल आणि त्रिमूर्ती चौक या दोन उड्डाणपुलांच्या निविदा प्रक्रिया विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून राबविणे, सिमेंट प्रतवारीच्या नावाखाली 44 कोटींची वाढीव किंमत, फेरनिविदा न काढताच, एम 60 प्रतवारीच्या सिमेंटच्या नावाखाली प्राकलनात बदल करणे, वाहतूक सर्वेक्षण न करताच प्रक्रिया राबविणे आणि सत्ताधारी भाजपसह मुख्य विरोधक असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमधील मिलीजुलीमुळे उड्डाणपूल वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याने तसेच सिमेंटसह अन्य साधनसामग्रीवर लावलेल्या स्टार रेटमुळे उड्डाणपुलांचा खर्च 300 कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिकेचा बांधकाम विभागच वादात सापडला आहे. गेल्या आठवड्यात सभागृहनेते बोडके यांनी उड्डाणपुलासंदर्भातील प्रक्रियेवर आक्षेप घेत, आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर आता भाजपचे गटनेते अरुण पवार यांनीही प्राकलनातील फेरबदलासाठी मागच्या दाराने करण्यात आलेल्या ठरावावरच आक्षेप घेत, पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा इशारा महापौरांना दिला आहे.

प्राकलनाला परस्पर मंजुरी कशी?

पक्षाच्या ध्येयधोरणानुसार कामकाज न केल्यामुळे पवार यांनी महापौरांकडे खुलासा मागितला असून, प्रस्तावावर सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षर्‍या करण्याचा अधिकार सभागृहनेते व गटनेते यांना असताना परस्पर मान्यता कशी दिली गेली, असा प्रश्न गटनेते पवार यांनी महापौरांना पत्राद्वारे केला आहे. भाजपमधील एक गट इतरांच्या सुरू असलेल्या कारभाराविरोधात एकवटला असून, पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी गेल्यास, ते काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून आहे.

ठेकेदाराबरोबर करारनाम्यासाठी घाई 

त्रिमूर्ती चौक आणि मायको सर्कल या दोन वादग्रस्त उड्डाणपुलांचे प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले असून, प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याच्या भीतीने प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारासोबत सुधारित करारनामा करण्याची घाई सुरू केली आहे. भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले आहे. त्यात करारनामा झाल्यास ही बाब मनपा प्रशासनाच्या अंगलट येऊ शकते.

महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असताना, प्रशासनाकडून विविध प्रकल्प तसेच कामांवर कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. मनपाकडून त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल अशा दोन पुलांसाठी 250 कोटींचे दोन उड्डाणपूल मंजूर करण्यात आलेत. त्यामुळे मनपाच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे. उड्डाणपुलाकरिता एम 40 ऐवजी एम 60 सिमेंट वापरण्यासंदर्भात झालेल्या फेरबदलामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची गरज होती. परंतु, सत्ताधारी भाजपने महासभेत मागील दाराने ठराव करीत या बदलाला मंजुरी दिली. त्यात फेरबदलात स्टाररेटची अट टाकल्याने संशय वाढला असून, पुलांची किंमत 300 कोटींच्या पुढे जाणार आहे.

या सर्व प्रक्रियेसंदर्भात विशिष्ट ठेकेदारासाठीच फेरबदल करण्यात आल्याची तक्रार करत भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. उड्डाणपुलाबाबत सर्व कागदपत्रे त्यांनी बांधकाम विभागाकडून मिळवून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने ठेकेदारासोबत करारनामा करण्यासाठी घाई सुरू केली असून, फेरबदल झालेल्या अटी व शर्तीसह वर्क ऑर्डर देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

उड्डाणपुलाबाबतची प्रक्रियाच संशयास्पद असून, न्यायप्रविष्ठ बाब असल्याने बांधकाम विभागाने ठेकेदारासोबत सुधारीत करारनामा करणे योग्य ठरणार नाही. तशी घाई मनपाकडून झाल्यास न्यायालयात जाब विचारला जाईल.
– मुकेश शहाणे, नगरसेवक

हेही वाचा

 

Back to top button