देशात कोरोना रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूंचे प्रमाण वाढले; २४ तासांत ७०३ जणांचा मृत्यू | पुढारी

देशात कोरोना रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूंचे प्रमाण वाढले; २४ तासांत ७०३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आकडा कायम आहे. त्याचबरोबर कोरोना मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ४७ हजार २५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७०३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २० लाख १८ हजार ८२५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २ लाख ५१ हजार ७७७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्या याआधीच्या दिवशीच्या तुलनेत २९,७२२ ने अधिक आहे. यामुळे पॉझिटिव्हिटी रेट १७.९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या ९,६९२ वर पोहोचली आहे.

याआधीच्या दिवशी जवळपास ८ महिन्यांनी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला होता. गेल्या बुधवारी दिवसभरात उच्चांकी ३ लाख १७ हजार ५३२ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ४९१ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान २ लाख २३ हजार ९९० रूग्णांनी बुधवारी दिवसभरात कोरोना संसर्गावर मात मिळवली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९३.६९ टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. यापूर्वी १५ मे २०२१ रोजी ३ लाख ११ हजार ७७ कोरोनाबाधित आढळले होते. गुरूवारी देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर १६.४१ टक्के, तर आठवड्याचा कोरोनासंसर्गदर १६.०६ टक्के नोंदवण्यात आला होता.

कोरोना संसर्गाच्या चिंता वाढवणार्‍या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली होती. १३ जानेवारीला संपलेल्या आठवड्याच्या तुलनेत २० जानेवारीला संपलेल्या आठवड्याचा म्हणजेच साप्‍ताहिक संसर्ग दर महाराष्ट्रात २०.३५ टक्क्यांवरून २२.१२ टक्के वाढला. दिल्‍लीचा ताजा साप्‍ताहिक संसर्ग दर तब्बल ३०.५३ टक्के आहे, तर केरळचा ३२.३४ टक्के आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान या १० राज्यांत सर्वाधिक सक्रिय बाधित आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली आहे.

‘दिल्लीतील तिसऱ्या लाटेचा उच्च बिंदू निघून गेला’

देशाच्या राजधानीतील तिसऱ्या लाटेचा उच्च बिंदू निघून गेला असावा, अशी शक्यता दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णसंख्येत वेगाने घट होत असली तरी अद्याप धोका टळलेला नाही, त्यामुळे निर्बंधही मागे घेतले जाणार नाहीत, असे जैन यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, देशात कोरोना लसीकरणाने १६० कोटींचा टप्पा पार केला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Back to top button