शेगावचा टिळा कपाळावरून जाण्याआधीच काळाचा घाला; कार अपघातात चौघांचा मृत्‍यू | पुढारी

शेगावचा टिळा कपाळावरून जाण्याआधीच काळाचा घाला; कार अपघातात चौघांचा मृत्‍यू

अकोला : पुढारी वृत्तसेवा

देवदर्शनासाठी शेगाव येथे गेलेल्या अमरावती जिल्ह्यातील चौघांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. रस्त्याचे काम रेंगाळत पडल्याने अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मागील 4 वर्षांपासून अकोट-अकोला रोड व देवरी-शेगाव रोडचे भिजत घोंगडे कायम असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणा व वनविभागाच्या आडकाठी वन कायद्यामूळे आतापर्यंत पाच जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. परतवाडा येथील आकाश अवधूत कूकडे, अंकूश प्रल्हादराव दिवटे रा. एकलासपूर, अक्षय अवघड, घनशाम बंडूजी चवरे (रा. अमळनेर) हे (एमएच २७ एआर 9796) कारने शेगाव येथे दर्शनासाठी जात होते. देवरी फाटा ते रौंदळा फाट्यानजीक कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात कारमधील चौघेही जागीच ठार झाले.

ही घटना सोमवारी रात्री 9.30 वाजता घडली. अपघाताची भीषणता एवढी होती की, कारचाही चुराडा झाला. या प्रकारास संबधीत वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. यासंदर्भात अकोट ब्रेकींग व्हॉट्सअप ग्रुपच्यावतीने उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन देवून संबधित अधिका-यांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

परतवाडा शहरात शोककळा…

या अपघाताची माहिती परतवाडा शहरात पोहोचताच शहरावर शोककळा पसरली. चौघे ही परतवाडा येथील ऋषभ जयसिंगपूरे यांची कार घेऊन ते अकोलाला जात असल्याचे सांगितले होते. प्राप्त माहितीनुसार हे चौघे ही शेगांव वरुन परतवाडा येथे येत होते. या चौघांच्या कपाळाला शेगांव येथे लावल्या जाणारा टिळा प्रामुख्याने दिसून येत होता. या दुर्घटनेतील अंकुश दिवटे हा एकलासपूर येथील निवासी असुन त्यांचे वडिल शेतमजुरी करतात. तर अंकुश वाहन चालकाचे काम करतो. तर विक्की अवघड हा छायाचित्रकार आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या सर्वांवर अंतिम संस्कार परतवाडा व एकलासपूर येथे करण्यात आले.

15 दिवसात 5 जणांचा मृत्यू

रौंदाळा येथील रस्ता अत्यंत खराब असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातस्थळी 15 दिवसांत अनेक अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रौंदळा या गावाजवळ रस्ता खराब असल्याने येथे नेहमीच अपघात होत आहेत. रविवारीही एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला होता.

Back to top button