'भाजपचे १३ आमदार पक्षाला रामराम करणार; आणखी काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत' | पुढारी

'भाजपचे १३ आमदार पक्षाला रामराम करणार; आणखी काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत'

पुढारी ऑनलाईन डेस्क

उत्तर प्रदेश विधान सभेच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपला चांगलेच धक्के बसायला सुरूवात झाली आहे. एक मंत्री आणि चार आमदारांनी एकाच दिवशी भाजपला रामराम ठोकला आहे. पुढच्या काही दिवसांत भाजपमधील नेते पक्ष सोडतील. यामध्ये तब्बल १३ आमदार आणि काही नेते पक्ष सोडणार असल्याचा दावा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. (UP Election)

पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी हा दावा केला. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याचेही पवारांनी सांगितले. गोवा आणि मणिपूरमध्ये राष्ट्रवादी उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशमध्ये ओबीसींचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर तासाभरातच ३ आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

शरद पवार म्हणाले, “उत्तर प्रदेशातील चित्र बदलत असून तिथे परिवर्तन होणार आहे. लोकांना बदल हवा आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपचा राजीनामा दिला ही सुरूवात आहे. त्यांच्यासोबत 13 आमदार व इतर काही नेते पक्ष सोडणार आहेत. पुढील काही दिवसांत आणखी नेते भाजप सोडून परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होतील. दररोज एक नवीन चेहरा दिसेल, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.”

भाजपच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काही मोठे नेते दिल्लीत दाखल झाला. त्यानंतर काही तासांतच चार आमदारांनी आपला तडकाफडकी राजीनामा दिला. ओबीसींचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी कॅबिनेट पदाचा राजीनामा दिला आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. (UP Election)

त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक असणारे रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती आणि भगवती सागर या ३ आमदारांनी राजीनामा दिला आहे. हे तिघेही समाजवादी पक्षात सामील होण्याची शक्यता बोलली जात आहे. मौर्य यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

Back to top button