नागपूर शहर पोलीस भरतीत डमी उमेदवार, तीन आरोपींना अटक | पुढारी

नागपूर शहर पोलीस भरतीत डमी उमेदवार, तीन आरोपींना अटक

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा

नागपूर शहर पोलीस भरतीत मूळ उमेदवारा ऐवजी डमी उमेदवारांना परीक्षेत बसवून भरती प्रक्रियेत घोळ घातल्याप्रकरणी ८ ते १० उमेदवार नागपूर पोलिसांच्या रडारवर आहेत. या विषयीची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

या पोलीस भरती रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर नागपूर गुन्हे शाखेने आधीच जयपाल कंकरवार, अर्जुन सुलाने आणि तेजस जाधव या तीन आरोपींना अटक केलीय. या प्रकरणी आणखी काही उमेदवारांनी परीक्षेत डमी उमेदवाराचा वापर केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आल्यामुळे पुढील २ ते ३ दिवसात आणखी काही आरोपींच्या अटकेची शक्यता आहे.

पोलीस विभागासह इतर शासकीय विभागातही या रॅकेटने भरती प्रक्रियेत काही घोळ केले आहेत का? याचा तपासही पोलीस करत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नागपूर शहर पोलीस पदाची भरती घेण्यात आली. यावेळी संपूर्ण भरती प्रक्रिया व्हिडिओ शूटिंग आणि सीसीटीव्हीत चित्रित करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेचे चित्रीकरण तपासत असताना काही उमेदवारांवर पोलिसांना संशय आला.

मूळ उमेदवारा ऐवजी डमी उमेदवारांनी लेखी व शारीरिक परीक्षा दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांची पडताळणी केली असता १२ ते १३ लाखात मूळ उमेदवाराएवजी डमी उमेदवाराला पोलीस भरती परीक्षेस पाठवून पास करून देण्यासाठी एक टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असली तरी पुढील तपासामध्ये अजून काही जणांना या प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.

Back to top button