Ratnakar Gutte : आमदार रत्नाकर गुट्टे यांना ईडीचा दणका, २५५ कोटींची मालमत्ता जप्त | पुढारी

Ratnakar Gutte : आमदार रत्नाकर गुट्टे यांना ईडीचा दणका, २५५ कोटींची मालमत्ता जप्त

बीड : पुढारी वृत्तसेवा

रासपचे (Rashtriya Samaj Paksha) आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांना ईडीने जोरदार दणका दिला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ईडीने तात्काळ कारवाई केली. काल रात्री उशिरा रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी, बीड आणि धुळ्यातील जवळपास २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे गुट्टे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

ईडीने मोठी कारवाई करत गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडसह तीन कंपन्यांची सुमारे २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने जीएसईएलशिवाय योगेश्वरी हॅचरिज आणि गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेड विरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली. या तिन्ही कंपन्यांविरोधात मनी लाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपन्यांच्या विरोधात गरीब शेतकऱ्यांच्या नावाने कृषी कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा आरोप आहे. हा आरोप स्पष्ट झाल्यानंतर ईडीने कारवाई केली आहे. ज्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले होते, त्या कंपन्यांची सुमारे २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. काल रात्री उशिरा ईडीने ही धडक कारवाई केली आहे. गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडची २४७ कोटी रुपये किंमतीची यंत्रे आणि पाच कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरिज, गंगाखेड सोलर पॉवरच्या परभणी, बीड आणि धुळ्यातील बँकांमधील सुमारे दीड कोटींची गुंतवणूक, तसेच गंगाखेड शुगर्सचे १ कोटीहून अधिक रुपयांचे समभाग अशी मालमत्ता जप्त केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जय भीम चित्रपटातल्या गाण्याचं हे मराठी कव्हर सॉंग जरूर ऐका | Cover Song of Jai Bhim | Jay bhim movie

Back to top button