गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूत दाखल | पुढारी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूत दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

लता यांचे सध्या वय ९२ आहे. त्या भारताच्य़ा गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांना सौम्य लक्षणे दिसल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले. वयोमानानुसार, त्यांना आरोग्याच्या अन्य समस्या असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांच्य़ा निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याआधी त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या कारणास्तव नोव्हेंबर २०१९ मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या बहिण उषा मंगेशकर यांनी सांगितलं होतं की, त्यांना व्हायरल इन्फेक्शन असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी आपला ९२ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लता मंगेशकर यांना कोरोनाची बाधा झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. तसेच मी डॉक्टरांना भेटूनही विचारपूस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button