फळे कशी खाऊ नयेत? | पुढारी

फळे कशी खाऊ नयेत?

चव वाढवण्यासाठी आपण अनेकदा खाण्या-पिण्यात अशा काही चुका करतो ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते. जसे चहामध्ये साखर आणि दूध घालणे, दह्यात मीठ किंवा साखर घालणे किंवा फळांमध्ये मीठ आणि चाट मसाला घालणे. फळे हेल्दी डायटचा भाग आहेत. त्यांच्यामध्ये असे अनेक अँटी-ऑक्सिडंट आढळतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. अनेक जण फळांचे फ्रूट सॅलड बनवतात, तर काही लोक फळे तशीच खातात, पण तुम्हाला माहीत आहे का फळांवर मीठ आणि चाट मसाला टाकून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. येथे जाणून घ्या फळे खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि फळे खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

मीठ घालण्याचे दुष्परिणाम : सध्या उन्हाळा असल्याने टरबूज, कलिंगड खाताना बरेच लोक त्यावर मीठ किंवा चाट मसाला घालतात. काही लोक खरबुजावर साखर घालून खातात. तुम्हाला माहीत आहे का की असे केल्याने तुम्ही त्यातील पोषक तत्त्वे नष्ट करत आहात? जेव्हा आपण फळांवर मीठ, चाट मसाला किंवा साखर घालतो तेव्हा ते जास्त पाणी सोडतात. अशा स्थितीत त्यातील अनेक पोषक घटक पाण्यासोबत निघून जातात. जर तुम्ही आरोग्यासाठी फळे खात असाल तर तुम्हाला कमी फायदा होईल.

सोडियम : वाढते मीठ टाकल्याने फळांमधील सोडियम वाढते. फळांमध्ये भरपूर खनिजे असतात आणि त्यांना अतिरिक्त मीठ लागत नाही. फळांवर मीठ टाकून खाल्ल्याने तुमच्या किडनीला हानी पोहोचू शकते. विशेषत: तुम्हाला किडनीशी संबंधित समस्या असल्यास हे अजिबात करू नका. पोट फुगू शकते. मीठ टाकल्याने फळांचा पीएच बदलतो. यामुळे फळे खाल्ल्यानंतर पोट फुगू शकते. जास्त फळे खाल्ल्यास पोट जड राहते. फळे खाण्यापूर्वी ते पूर्णपणे धुणे देखील महत्त्वाचे आहे. आजकाल बहुतांश फळांवर धोकादायक कीटकनाशकांची फवारणी केली जाते. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुम्हाला फायद्यापेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागू शकते. फळे काही वेळ पाण्यात भिजत ठेवावीत. त्यांना मीठ, बेकिंग सोडा किंवा व्हिनेगरमध्ये कमीत कमी 20 मिनिटे राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने धुवून खा.

Back to top button