जगातील सर्वात उष्ण ठिकाणे; ‘इथे’ तापमान पाेहाेचते 70.7 अंश सेल्सिअसवर | पुढारी

जगातील सर्वात उष्ण ठिकाणे; 'इथे' तापमान पाेहाेचते 70.7 अंश सेल्सिअसवर

नवी दिल्ली : सध्या देशभरात उन्हाळ्याने ‘त्राही माम’ करून सोडले आहे. अंगाची काहिली करणार्‍या या उन्हाळ्यात माणसांपासून ते पशुपक्ष्यांपर्यंत सगळेच त्रस्त झाले आहेत. आपल्याकडे तापमान 40 अंशांवर पोहोचले तरी आपल्याला ते सहन होत नाही; मात्र जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणे अशी आहेत जिथे तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंतही जाते. अशाच काही ठिकाणांची ही माहिती…

जगातील सर्वात उष्ण ठिकाणांमध्ये अमेरिकेच्या डेथ व्हॅलीचा समावेश होतो. कॅलिफोर्नियामधील हे ठिकाण अतिशय उष्ण असून तिथे 56.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होते. इराणमध्ये ‘दश्त-ए-लुत’ नावाचे वाळवंट आहे. या वाळवंटात तर 70.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. सुदानमध्ये वादी हल्फा नावाचे ठिकाण आहे. हे ठिकाण नाईल नदीच्या काठावर आहे. येथील कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. ट्युनिशियामध्ये केबिली नावाचे ठिकाण आहे.

सहारा वाळवंटातील या भागातही 50 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाते. इराणमध्ये अघजरी नावाचे ठिकाण आहे. याठिकाणी नियमितपणे तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. भारतात जैसलमेरचे तापमान उन्हाळ्यामध्ये 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढते. सौदी अरेबियात बुरैदाह नावाचे ठिकाण आहे. तेथील तापमानही अनेक वेळा 50 अंशांपेक्षा अधिक असते.

Back to top button