सब्जा आणि चिया सिडस्मध्ये फरक काय? | पुढारी

सब्जा आणि चिया सिडस्मध्ये फरक काय?

आधुनिक काळात आपल्या आरोग्याबाबतची जागृती अधिक प्रमाणात वाढलेली दिसून येते. विशेषतः कोव्हिड महामारीच्या काळापासूनच तर ही जागृती अधिकच वाढलेली आहे. त्यामुळे एरवी आपल्या आहारात फारशी नसलेली एवोकॅडो, पिअर, ड्रॅगन फ्रूट, किवी यासारखी फळे आणि मखाना, ओटस्सारखे पदार्थही अनेकांच्या आहारात येत आहेत.

सध्या वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी अनेक जण आहारात सब्जा, चिया सीडस्चा वापर करत असतात. फळांची स्मुदी, भाज्यांचे सॅलेड, गोडाचे पदार्थ अशा अनेक पदार्थांमध्ये या दोन्ही गोष्टींचा वापर केला जातो. मात्र, अनेक जण चिया सीडस् आणि सब्जा हे दोन्ही एकच पदार्थ आहेत असे समजण्याची अगदी साधारण चूक करतात; मात्र या दोन्ही पदार्थांमध्ये फरक आहे. चिया सीडस्ना त्यांची स्वतःची अशी कोणतीही चव नसते. त्या बिया ज्या पदार्थात घातल्या जातात, त्याची चव त्या घेतात. सब्जा या तुळशीच्या बिया असल्याने त्यांना तुळशीची हलकी चव असते. या दोन बियांमध्ये काय फरक आहे ते पाहू…

  1. चिया सीडस्चा रंग हा साधारण करडा किंवा चॉकलेटी असा असतो, तर सब्जा म्हणजेच तुळशीच्या बिया या संपूर्ण काळ्या रंगाच्या असतात.
  2. चिया सीडस्मध्ये ओमेगा-3 हे फॅटी अ‍ॅसिडस्, प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असतात, तर सब्जामध्ये फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह असे पोषक घटक असतात. सब्जामध्येही ओमेगा-3 हे फॅटी अ‍ॅसिड असते, मात्र त्यांचे प्रमाण कमी असते.
  3. चिया सीडस् आणि सब्जामधील सर्वात मोठा फरक म्हणजे दोघांना लागणारे पाणी. चिया सीडस् पाण्यात भिजण्यासाठी भरपूर वेळ घेतात. तसेच चिया सीडस् पाण्यात भिजल्यावर दहापट पाणी शोषून घेतात. मात्र, सब्जा पाण्यात लगेच भिजतात आणि सब्जा पाण्यात भिजल्यानंतर त्यावर पारदर्शक असा एक थर तयार होतो.
  4. सौम्य चव असणार्‍या चिया सीडस् सॅलेड, पुडिंग, शीतपेय यासारख्या अनेक पदार्थांमध्ये चांगल्या पद्धतीने एकजीव होतात. तसेच तुळशीचा हलका गंध आणि चव असणारा सब्जा हा पदार्थ सरबतांमध्ये अतिशय छान लागतो.

आरोग्यासाठी लाभ : चिया सीडस् आपल्या आहारात घेतल्याने, दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. तसेच पचनात मदत करून, वजन कमी करण्यासाठीही उपयोगी ठरते. चिया सीडस् आहारात घेतल्याने हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते, तर सब्जाचा आहारात समावेश केल्याने पचनात मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. तसेच सब्जा हा त्वचेसाठी फायदेशीर असून, तणाव कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो.

दुष्परिणाम : सब्जा आणि चिया सीडस्चे अतिप्रमाणात सेवन केल्याने पोट दुखण्याची अथवा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकते. तसेच सब्जा व्यवस्थित न भिजवल्यास त्याचाही त्रास पोटाला होऊ शकतो.

Back to top button