खेळण्याच्या कारमधून 800 किमीचा प्रवास! | पुढारी

खेळण्याच्या कारमधून 800 किमीचा प्रवास!

वॉशिंग्टन : जगात कोण काय करील हे काही सांगता येत नाही. ‘अराऊंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स’ सारखे चित्रपट जुन्या जमान्यात आले होते. केवळ नौकेत बसून जगप्रवास करणारे, सायकलवरून विश्वभ्रमंती करणारेही अनेक लोक असतात. आता अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारी कॅसी अ‍ॅरॉन आणि लॉरेन या दोन मैत्रिणी त्यांच्या अनोख्या कामामुळे चर्चेत आहेत. खरं तर दोन्ही मैत्रिणी खेळण्यातील कारमधून जगातील सर्वात लांब प्रवास करण्यासाठी निघाल्या आहेत. त्यांचा हा अनोखा प्रवास 804 किलोमीटरचा असेल.

अ‍ॅरोन आणि लॉरेन यांनी मार्चमध्ये फ्रेंडशिप फाऊंटन, फ्लोरिडा येथून प्रवास सुरू केला असून साऊथ पॉईंट बॉय येथे तो संपेल. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे दोन महिने लागतील. त्यांचा हा प्रवास यशस्वी झाला तर खेळण्यातील कारमधून एवढा लांबचा प्रवास करणार्‍या त्या पहिल्या व्यक्ती ठरतील. या प्रवासात त्यांचा मित्र ब्रॅंडन लुकांटेही त्यांना मदत करत आहे. कॅसी अ‍ॅरॉन आणि लॉरेन यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे दोघींनी मिळून टॉय कारमधून हा अनोखा प्रवास करण्याचा विचार केला. कॅसी आणि लॉरेन त्यांच्या सहलीचे अपडेटस् सोशल मीडियावर शेअर करत राहतात. त्यांचा प्रवास सुरू होऊन नऊ ते दहा दिवस झाले आहेत.

कॅसी आणि लॉरेन प्राणी कल्याणासाठी देखील काम करतात. आपल्या अनोख्या प्रवासातून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी सुमारे 49 हजार रुपये जमा केले आहेत. हा प्रवास पूर्ण होईपर्यंत 8 लाख रुपयांहून अधिक निधी गोळा करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. या निधीतून नेपाळमधील रेड पांडा नेटवर्क, कोस्टा रिका अ‍ॅनिमल रेस्क्यू सेंटर, मिनेसोटामधील सेव्ह-ए-फॉक्स रेस्क्यू, मिसूरीमधील जागतिक पक्षी अभयारण्य यांना मदत करण्यात येईल. कॅसी आणि लॉरेनचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दहा लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या अनुयायांच्या मदतीने त्या डोनेशन मोहीम राबवत आहेत. कॅसी ‘द इअर सॉक्स’ नावाची कपड्यांची कंपनी देखील चालवते. त्यातील 10 टक्के उत्पन्न ती बेस्ट फ्रेंडस् अ‍ॅनिमल सोसायटीला दान करते. ही सोसायटी 2025 पर्यंत प्राणी हत्या संपवण्याच्या दिशेने काम करत आहे.

Back to top button